कोविडमुक्त 22 वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपण, भारतातील पहिली शस्त्रक्रिया

भाग्यश्री भुवड
Sunday, 18 October 2020

मुंबईतील ‘नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ‘कोव्हिड-19’ मधून सावरलेल्या एका 22 वर्षांच्या तरुणावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. मुंबईचा रहिवासी असलेल्या रोशन गुरवला गेल्या 17 वर्षांपासून यकृताचा तीव्र स्वरुपाचा आजार होता.

मुंबई: मुंबईतील ‘नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ‘कोव्हिड-19’ मधून सावरलेल्या एका 22 वर्षांच्या तरुणावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. मुंबईचा रहिवासी असलेल्या रोशन गुरवला गेल्या 17 वर्षांपासून यकृताचा तीव्र स्वरुपाचा आजार होता. त्याला त्याच्या आईने स्वतःच्या यकृतापैकी 50 टक्के भाग दान केला अन् रोशनला नवीन आयुष्य मिळाले. 

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकुर गर्ग यांनी आणि त्यांच्या पथकाने केली. 

रोशन हा पाच वर्षांचा असल्यापासूनच यकृताच्या तीव्र रोगाने ग्रस्त होता. त्याच्या ‘एमईएलडी’चा गुणांक (मॉडेल फॉर एन्ड-स्टेज लिव्हर डिसीज) हा 35 पेक्षा जास्त होता. रोशनच्या या परिस्थितीमुळे, त्याच्यावर उपचार करण्यास उशीर झाला असता, तर त्याच्या यकृताची कार्ये अजून बिघडली असती आणि त्याच्या आयुष्याला धोका निर्माण झाला असता. एखाद्या रुग्णाची मूत्रपिंडे निकामी झाल्यास डायलिसिस सारखे उपचारात्मक पर्याय उपलब्ध आहेत. यकृताच्या आजारात तसें  शक्य नाही. येथे शेवटच्या टप्प्यात असलेल्या यकृताच्या आजारासाठी ते यकृतच बदलणे हा एकमेव उपाय होता. तसा सल्ला रोशनच्या कुटुंबाला दिला. 

अधिक वाचाः  मुलूंड कोविड केंद्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेला पालिकेची नोटीस

सुदैवाने रुग्णाच्या आईचे यकृत रुग्णाच्या शरीराला जुळणारे निघाले. तिच्या यकृताचा काही भाग दान करणे वैद्यकीयदृष्ट्या शक्य होते असे डॉ. गर्ग यांनी सांगितले. शिवाय, प्रत्यारोपणापूर्वीच्या तपासणीदरम्यान रोशनला ‘कोविड-19’ची लागण झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला. अवयव प्रत्यारोपणाच्या ‘प्रोटोकॉल’नुसार शस्त्रक्रिया सहा आठवडे लांबवण्यात आली. रोशनने ‘कोविड’च्या संसर्गाचा सामना केला, त्यानंतरच वैद्यकीयरित्या त्याच्या यकृतातील समस्येवर, ऑप्टिमाइझ केलेल्या इम्युनोसप्रेसन्ट आणि अँटीबायोटिक्स यांद्वारे उपचार केले. दोन तीव्र स्वरुपाचे आजार एकत्र असतानाही तो आठवड्याभरात बरा झाला, अशी माहिती ‘एचआयपीबी सर्जरी’ आणि यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. वैभव कुमार दिली.

रोशनवर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याची आणि अवयवदात्री असलेली त्याची आई या दोघांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यावर कोणताही अनुचित प्रसंग न घडता, दोघांची प्रकृती सुधारली व दोन आठवड्यांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

यावेळी रोशनची आई, रश्मी यांनी सांगितले की,  रोशनच्या यकृताच्या समस्येमुळे त्याला कावीळ, पोटदुखी, उलट्या आणि पोटात द्रव जमा होणे असे त्रास वारंवार होत होते. गेली 15-16 वर्षे त्याने हे सारे सोसले. तो नेहमी अभ्यासात चांगला होता. परंतु आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्याला त्यांबाबत महत्त्वाकांक्षा बाळगता आल्या नाहीत.  आता यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने तो सामान्य जीवन जगू शकेल असे त्या म्हणाल्या.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Liver transplantation covid free 22 year old boy first successful surgery India


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liver transplantation covid free 22 year old boy first successful surgery India