
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील धीरुभाई अंबानी शाळा उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बुधवारी गुजरातच्या मोरबी येथून अटक करण्यात आली आहे.
Mumbai Crime : बॉम्बची धमकी देणारा आरोपी गुजरातच्या मोरबीतून अटकेत
मुंबई - वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील धीरुभाई अंबानी शाळा उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बुधवारी गुजरातच्या मोरबी येथून अटक करण्यात आली आहे. 34 वर्षीय आरोपीचे नाव विक्रम सिंग असून तो गुजरातच्या मोरबीचा रहिवासी आहे. मंगळवारी 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता धीरूभाई अंबानी शाळेच्या लँडलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तुमच्या शाळेत टाईम बॉम्ब ठेवला असल्याचे सांगून कॉलरने कॉल कट केला.
धमकी मिळताच प्रकरण गंभीर असल्यामुळे तससेच पूर्वी सुद्धा अंबानी कुटुंबाला अनेकदा धमक्या देण्यात आल्यामुळेच धीरूभाई अंबानी शाळेने यासंदर्भात बीकेसी पोलिसांना कळवले. शाळेच्या तक्रारीच्या आधारे, बीकेसी पोलिसांनी अज्ञात कॉलर विरुद्ध भादंवि कलम 505 (1) (बी) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
मिळालेल्या माहिती प्रमाणे, पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. तसेच कॉल कुठून आला आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. घटनेनंतर काही वेळातच पोलिसांना कॉल नेमका कुठून आला आहे याचा सुगावा लागला. त्यानुसार पुढील कारवाईला सुरुवात झाली. अखेर गुजरातच्या मोरबी येथून पोलिसांनी बुधवारी संबंधित इसमाला अटक केली. विक्रम सिंह असं या आरोपीचं नाव असून तो 34 वर्षांचा आहे. त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.