esakal | डोंबिवली: गांधीनगर नाल्यात केमिकल सोडणाऱ्या कंपन्यांना दणका!
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali nala

डोंबिवली: गांधीनगर नाल्यात केमिकल सोडणाऱ्या कंपन्यांना दणका!

sakal_logo
By
अमित उजागरे

ठाणे : डोंबिवली शहरातील गांधीनगर नाल्यामध्ये विषाणी सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फेसबुकवर कारवाईनंतरचा एक व्हिडिओ पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. दरम्यान, सरकारने या प्रश्नी तातडीने दखल घेत केलेल्या कारवाईबद्दल मनसेचे नेते राजू पाटील यांनी प्रदुषण नियंत्रण बोर्ड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे यापूर्वी हिरवा, नारंगी पाऊस, त्यानंतर रसायनामुळे गुलाबी, निळे झालेले रस्ते यापूर्वी पाहिले आहेत. सोमवारी पडलेल्या पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत असून गांधीनगर येथील नांदीवली नाला चक्क हिरवा झाल्याचे पहायला मिळाले. पावसाचा फायदा घेत कंपन्यांनी आपले रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने पूर्ण नाला हिरवा झाला होता.

गेल्या दोन दिवसंपासून जोरदार पाऊस पडत असल्याने नांदीवली नाला हा भरून वाहत होता. याचाच फायदा घेत सोमवारी एमआयडीसीतून नाल्यात केमिकल सोडण्यात आले. त्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा रंग आला होता, तसेच उग्र वासही येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. "सकाळी ९ ते १० या वेळेत हे हिरवे पाणी वाहत होते. सकाळी ९ च्या दरम्यान नाल्यातील पाणी गडद हिरवे झाले होते. त्याविषयी आम्ही लगेच फेसबुकवर पोस्ट केली त्यानंतर दहा वाजल्यानंतर हे प्रदुषण कमी झालं आणि पाण्याचा रंग साधारण झाला. या समस्येबाबत कामगार संघटना, प्रदूषण मंडळ यांच्याकडे रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. पण ही समस्या काही कमी झालेली नाही. शाळेतील मुले, रहिवाशांनी आणखी किती दिवस या नाल्याचा व त्यात सोडल्या जाणाऱ्या केमिकलचा त्रास सहन करायचा" असं नागरिक राहुल कुलकर्णी व शशिकांत कोकाटे यांनी सकाळशी बोलताना स्थानिकांची व्यथा मांडली होती.

याची माहिती मिळताच मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करुन आणि ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करीत माहिती दिली. गांधीनगरचा हा नाला बंदिस्त करावा किंवा पाईपलाईनद्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे. याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही काही होताना दिसत नाही असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. राजू पाटील यांच्या या ट्विटनंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ नाल्यात प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश दिले.

loading image