अभिनेता कमाल खानवर विनयभंगाचा गुन्हा दाखल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krk

अभिनेता कमाल खानवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेत्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आधीच अटक असलेला वादग्रस्त अभिनेता कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके याला मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी विनयभंगाच्या एका प्रकरणात अटक केली आहे. रविवारी 4 सप्टेंबर रोजी कमाल खानला एका जुन्या विनयभंगाच्या प्रकरणात अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून 2021 मध्ये कमाल खानविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (अ) आणि आयपीसी 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान यांनी जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात तक्रारदाराकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.

केआरकेला गेल्या आठवड्यातच अटक

कमाल खानला गेल्या आठवड्यात मुंबईच्या मालाड पोलिसांनी जुन्या ट्विटसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. 2019 मध्ये, खान यांनी लव्ह जिहादशी संबंधित एक वादग्रस्त ट्विट केले होते आणि त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेपूर्वी कमाल खानला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यावर ट्विट करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कमाल यांच्यावर होता. केआरकेने दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याविरोधात द्वेषपूर्ण टिप्पणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.