मुंबईच्या चिंतेत आणखी भर! कोव्हिड रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची कमतरता; नर्सिंग होम बंद झाल्याने फटका

तुषार सोनवणे
Friday, 11 September 2020

कोव्हिड रुग्णांचा वाढता आकडा पाहता पालिकेने खासगी नर्सिंग होममध्येदेखील कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी सोय केली होती. मात्र, गेल्या  महिन्यात कोव्हिड रुग्णांसाठी नर्सिंग होम बंद करण्यात आले.

मुंबई :  कोव्हिड रुग्णांचा वाढता आकडा पाहता पालिकेने खासगी नर्सिंग होममध्येदेखील कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी सोय केली होती. मात्र, गेल्या  महिन्यात कोव्हिड रुग्णांसाठी नर्सिंग होम बंद करण्यात आले. त्यामुळे, मुंबईत आता रुग्णसंख्या पुन्हा वाढत असताना त्या तुलनेत आयसीयू बेड्सची कमतरता भासत आहे. मात्र, कोव्हिडसाठी तयार केलेली व्यवस्था ही सध्याच्या परिस्थितीसाठी पुरेशी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

उत्पन्न बंद झाल्याने वसई 'एपीएमसी'च्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड;  बाजार समितीचा मात्र स्वेच्छानिवृत्तीचा सल्ला

मुंबईत आतापर्यंत खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयातील तसेच, जम्बो सुविधा केंद्रात मिळून 1413 आयसीयू बेड्स आहेत. त्यातील फक्त 125 बेड्स रिक्त आहेत. ज्या नर्सिंग होममध्ये 50 पेक्षा कमी बेड्स आहेत त्यांनी कोव्हिड रुग्णांवर उपचार न करता इतर नाॅन कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू करावेत, असा निर्णय  गेल्या महिन्यात पालिकेकडून घेण्यात आला होता. मात्र, यामुळे आता आयसीयू बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. 
गणेशोत्सव आणि अनलॉकच्या पुढील टप्प्यामुळे मुंबईत मोठ्या संख्येने पुन्हा वाढली. 33 खासगी रुग्णालयातही बेड्स उपलब्ध आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ते अपुरे पडण्याची शक्यता आहे.  मुंबईत बुधवारी 2,227 कोरोना रुग्ण आढळले. तर, 19 दिवसांतील सर्वाधिक मृत्यूदर बुधवारी 40  एवढा नोंदवला गेला.   पालिकेने 72 नर्सिंग होम्समध्ये कोव्हिड उपचारास बंदी घातली आहे. 

 

मुंंबईतील केवळ टी वाॅर्डमध्ये रोज 50 बाधित आढळत आहेत.  मुलुंडचे फोर्टिस रुग्णालय, जम्बो कोविड सुविधा आणि एका सार्वजनिक रुग्णालयांत या रुग्णांवर उपचार होत आहे. विभागातील उर्वरित 4 रुग्णालयांना पालिकेने कोव्हिडची सुविधा देऊ नये, असे सांगितले. तेव्हापासून आयसीयू बेडसाठी लोकांची गर्दी वाढत आहे. जम्बो सेंटरमधील 215 आयसीयू बेड्सही अजून सुरू नाहीत. 
- मिहिर कोटेचा,
भाजप आमदार 

 

सध्या पॅनिक परिस्थिती नाही. 125 आयसीयू बेड्स पुरेसे आहेत. आपल्याकडे 936 व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी 69 रिक्त आहेत. तर, आणखी 250 आयसीयू बेड्सची वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 50 आयसीयू बेड्स हे याआधीच दिले गेले आहेत.
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त, पालिका

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Add to Mumbais worries Lack of ICU beds for covid patients Nursing home closed