कोकणात जाण्यासाठी ठाण्यातील चाकरमानींसाठी जादा एसटी बसेस सोडणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

राहुल क्षीरसागर
Friday, 7 August 2020

एसटी विभागाने कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून 397 ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत.

ठाणे : एसटी विभागाने कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून 397 ज्यादा बस सोडण्यात येणार असून, यामध्ये सर्वाधिक बस ठाणे 1-2 मधून 117 तर, बोरिवली येथून 115 बस सोडण्यात येणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली.

 रायगड जिल्हा परिषदेत कोरोनाचा धुडगूस; अँटिजेन तपासणीत इतक्या जणांना लागण झाल्याचे उघड 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सणावर देखील काही निर्बंध आले आहेत. त्यात कोकणात खासगी वाहनाने जायचे असल्यास ई-पास  काढणे बंधनकारक आहे. तेच खासगी बस प्रवासी वाहतुकीने जायचे असल्यास प्रवासी पास काढावा लागणार आहे. मात्र, खासगी बस चालकांनी अवाच्या सव्वा दर आकरणी केल्याने चाकरमान्यांची मोठी अडचण होत आहे. मात्र, राज्य परिवहन महमंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात बस सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाकरमान्यांसमोरचे विघ्न दूर झाले. 

ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी, बोरिवली आणि भाईंदर या पाच आगारांतून 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या आठ दिवसाच्या कालावधीत 397 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये ठाणे सीबीएस येथून सर्वाधिक 117 तर, बोरिवली येथून 115 तर, विठ्ठलवाडी 85, कल्याण 76 तर, भाईंदर येथून चार बस सोडण्यात येणार आहेत.

मलबार हिलचे सर्वेक्षण सुरु; जलवाहिन्या दुरूस्तीच्या कामामुळे रविवारपर्यंत या परिसरात टॅंकरने पाणी पुरवठा

बसेसमध्ये सामाजिक अंतर पाळून केवळ 22 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क परिधान करणे बंधनकारक असणार असून प्रवासआधी संपूर्ण गाडीचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली.

 

तीन दिवसात 72 बस कोकणात रवाना
ठाणे जिल्ह्यातील पाच विभागातून कोकणात गणेशोत्सवासाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून बुधवार 5 ऑगस्टपासून कोकणात बस सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या तीन दिवसाच्या कालावधीत सुमारे 72 जादा बस सोडण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional ST buses will be released for Chakarmanis in Thane to reach Konkan; Learn the details