esakal | आदित्य ठाकरे- अतुल भातखळकर लढतीत, मनसे गेमचेंजर ठरण्याची शक्यता?
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरे- अतुल भातखळकर लढतीत, मनसे गेमचेंजर ठरण्याची शक्यता?

मुंबई महापालिका निवडणुकीत अतुल भातखळकरांसारख्या अनुभवी भाजप नेत्याशी टक्कर घेणाऱ्या तरुणतुर्क आदित्य ठाकरे यांचे नाणे बावनकशी ठरणार की त्यांचे पितळ उघडे पडणार याकडे आता तमाम राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे. 

आदित्य ठाकरे- अतुल भातखळकर लढतीत, मनसे गेमचेंजर ठरण्याची शक्यता?

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबईः  साधारण चौदा महिन्यांनंतर होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत अतुल भातखळकरांसारख्या अनुभवी भाजप नेत्याशी टक्कर घेणाऱ्या तरुणतुर्क आदित्य ठाकरे यांचे नाणे बावनकशी ठरणार की त्यांचे पितळ उघडे पडणार याकडे आता तमाम राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे. 

या लढतीत काँग्रेसची मुस्लिम आणि दलित मते शिवसेनेला मिळाली तर त्यांना मोठेच यश मिळेल. पण त्याचवेळी मनसेने शिवसेनेच्या मराठी मतपेढीला भगदाड पाडले तर त्याचा फायदा भाजपला होईल. भाजपच्या नगरसेवकांनी लोकांची कामे करून पक्षाचे स्थान बळकट केले आहे. तर शिवसेनेचा भर कामापेक्षा भावनिक लाटेवर असतो, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चांगला पर्याय आला तर त्यांना मोठा फटका बसेल असेही दाखवून दिले जात आहे. मुंबईकरांना सेनेविरोधात भाजपचा पर्याय चालेल का, याचे उत्तर पहिल्यांदाच 14 महिन्यांनी मिळू शकते. 

मुंबईची वॉर्डनिहाय माहिती असलेल्या भातखळकरांना उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या टीमशी झुंज घ्यावी लागणार आहे. राज्यात आणि महापालिकेत सत्ता असल्याने सेनेला बारा हत्तींचे बळ आले आहे. तर केंद्रात सत्ता, खासदार, आमदार, नगरसेवक अशी फौज दिमतीला असल्याने भाजप देखील सुस्थितीत आहे. भाजपला मागील महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा अनुभव आहे. मात्र लोकसभा-विधानसभा निवडणुकीत सेनेशी युती केल्यावर आता शहरातील संघटना एकत्र बांधण्याचे आव्हान भातखळकरांपुढे आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती असल्याने त्यांची मते आपल्याला मिळतील आणि आपण भाजपला सहज मात देऊ अशी सेनानेतृत्वाला अपेक्षा आहे. तर सेनेची मराठी मते मनसेचे उमेदवार खातील आणि अमराठीभाषक मतांच्या जोरावर आपण बाजी मारू अशी भाजपची खात्री आहे. गेल्या एक दोन वर्षांत मराठीचा तारणहार ही भूमिका आता मनसेकडे आल्याने त्यांची ताकद हळुहळू वाढत असल्याचे यासंदर्भात दाखवून दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेसाठी मनसे जेवढे जास्त उमेदवार उभे करेल तेवढा आपल्याला फायदा होईल, असा भाजपचा अंदाज आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे ने अशाच प्रकारे भाजपला मदत केली होती. तोच प्रयोग महापालिका निवडणुकीत होईल का हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल.

अधिक वाचा-  मुंबईतील शाळा बंद, मात्र सोमवारपासून ठाण्यातल्या शाळांची वाजणार पहिली घंटा

आदित्य ठाकरे यांची तरुण, कार्यक्षम आणि स्वच्छ प्रतिमा पुढे करण्याचा सेनेचा प्रयत्न राहील. तर ज्युनिअर ठाकरेंच्या कारभारातील उणिवांवर भाजप बोट ठेवणार हे निश्चित आहे. पालकमंत्री असूनही अतिवृष्टी-कोरोना या कठीण काळात उपनगरांना भेट न देणे, बैठका न घेणे, विशेष निधी न आणणे याचा प्रचार भाजपतर्फे केला जाईल. पालकमंत्र्यांच्या हाती वर्षाला तीनशे-चारशे कोटींचा निधी असतो, त्याचाही हिशोब मागितला जाईल, असेही भाजप नेते सांगत आहेत. महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्ट कारभार, नागरी सुविधांचा अभाव, कोरोना काळातील गोंधळ, त्यांची मराठीविरोधी धोरणे, भाजप सरकारने हाती घेतलेल्या मेट्रो आणि अन्य सुविधांची थंडावलेली कामे या मार्गानेही सेनेवर हल्ला करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

युतीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आपल्याला मिळतील, असे सेनेला वाटते. पण काँग्रेसची मुस्लिम आणि दलित मते किती प्रमाणात सेनेकडे वळतील यावरच त्यांचे यश अवलंबून राहील. त्या दोघांचे मनोमीलन आणि मतमीलन झाले तर शिवसेना भाजप ला मोठाच दणका देऊ शकेल. पण हे होणार नाही, उलट काँग्रेसची अमराठी मते भाजपलाच मिळतील अशी त्या पक्षाच्या नेत्यांना खात्री आहे. त्यातच पंचवीस वर्षे सत्तेवर असल्याने प्रस्थापितविरोधी लाट, सेनेच्या विचारधारेत बदल झाल्याने दुखावलेला मतदार यांचा फायदा होण्याची अपेक्षा भाजपला आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Aditya Thackeray Atul Bhatkhalkar in fight MNS likely to be game changer