मुंबईतील शाळा बंद, मात्र सोमवारपासून ठाण्यातल्या शाळांची वाजणार पहिली घंटा

शर्मिला वाळुंज
Friday, 20 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका शाळा सोमवारपासून खुल्या न करता बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मुंबईतील शाळा बंद राहणार असल्यातरी सोमवारपासून ठाणे जिल्ह्यातील शाळा मात्र सुरुच राहणार असल्याचे स्पष्टीकरण ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी दिले. 

मुंबईः  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका शाळा सोमवारपासून खुल्या न करता बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मुंबईतील शाळा बंद राहणार असल्यातरी सोमवारपासून ठाणे जिल्ह्यातील शाळा मात्र सुरुच राहणार असल्याचे स्पष्टीकरण ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी दिले. 

शाळा सुरु होणार असल्यातरी मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय योग्य होईल का? या संभ्रमात पालकवर्ग अडकला असून, पंधरा ते वीस टक्के पालकांचीच शाळेत मुले पाठविण्याची तयारी असल्याचे दिसून येत आहे. वर्ग भरविण्याऐवजी ऑनलाईन वर्गच योग्य असल्याचे मत शिक्षकांबरोबर पालकही व्यक्त करीत आहेत.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने 23 नोव्हेंबरला शाळा सुरु करण्याचा निर्णय रद्द करीत 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे वृत्त समजताच ठाणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षकांमध्येही ठाणे जिल्ह्यातील शाळांविषयी काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

मात्र ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून सरकार नियमांचे पालन करीत सुरु होणार आहेत. शाळांची पूर्ण तयारी झाली असून या निर्णयात शक्यतो बदल होणार नाही असे ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी सांगितले. शाळा सुरु करण्याची प्रशासनाची, शाळांची तयारी झाली असली तरी पालक मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास अद्याप तयार नाहीत. शाळांनी पालकांची बैठक बोलावित त्यांच्याकडून हमीपत्र भरुन मागविले आहे. मात्र केवळ पंधरा ते वीस विद्यार्थ्यांचेच पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत. कोरोना रुग्णांचा कमी झालेला आकडा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वाढू लागल्याने दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. याची चिंता पालकांना सध्या सतावत असल्याचे मत पालकांनी बैठकीत मांडले.

अधिक वाचा-  ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

शाळांमध्ये खबरदारी घेण्यात आली तरी, मुले अनेक ठिकाणांहून शाळांमध्ये येणार आहेत. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली तर जबाबदारी कोणाची नक्की असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे. तर काही पालकांनी मात्र आपली मुले या परिस्थितीशी लढण्यास कधी तयार होणार असे म्हणत त्यांना शाळेत पाठविण्यास तयारी दर्शविली आहे. 

ऑनलाईन शिक्षणाचाच पर्याय योग्य असल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. नोव्हेंबर महिना संपत आला असून बऱ्याचशा शाळांमध्ये दहावीचा अभ्यासक्रम हा 75 टक्के पूर्ण होत आला आहे. ऑनलाईन वर्गाद्वारे अभ्यासक्रम सुरळीत सुरु असताना, दुसऱ्या लाटेची भिती असताना शाळा सुरु करण्याची घाई करु नये असे शिक्षकांसोबत पालकांचेही म्हणणे आहे.

अधिक वाचा-  ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी; भाजपचा टोला

पालकांची संभ्रमावस्था असली तरी शिक्षकांना मात्र शाळा सुरु करावयाची असल्याने शाळांची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर आदि वैद्यकीय उपकरणे शाळांत ठेवण्यात आली आहेत. शिक्षकही स्वतःची कोरोना चाचणी करुन घेत आहेत. शाळांची तयारी झाली असून सोमवारी शाळांत काय चित्र दिसते ते पाहू असे मुख्याध्यापिका लिना मॅथ्यू यांनी सांगितले.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Schools Mumbai closed Thane district schools start from monday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools Mumbai closed Thane district schools start from monday