आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; ते म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक कार्यालयात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली.

आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी 12.15 च्या सुमारास अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या शक्तिप्रदर्शनाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेचे आभार मानले. शिवाय, मनसेने आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याबाबत विचारले असता त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांचे आभार मानताना ते म्हणाले, 'आदित्यला या निवडणुकीसाठी जे जे आशीर्वाद देत आहेत त्यांना मी धन्यवाद देतो, मी या सर्वांप्रती ऋणी आहे. शिवाय, वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचे विशेष आभार मानले.'

उद्धव ठाकरे म्हणाले, 'वरळीमधील जनतेने आदित्यचा स्वीकार केला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्यापर्यंत निवडणूक न लढविण्याची आमच्या कुटुंबाची परंपरा होती. मात्र, आता नवीन पिढी आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे विचार नवे आहेत. तरुणांच्या विचारानेच देश आणि राज्य पुढे जावे ही जनतेची इच्छा आहे. आमची परंपरा जनतेची सेवा करण्याची आहे. ती पुढच्या पिढीत देखील कायम आहे. आम्ही निवडणूक न लढवता सेवा केली. मात्र, ही आजची नवी पिढी आहे. आदित्यासोबत तुमचा आशीर्वाद कायम राहिलं, हा विश्वास आहे.'

आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी सर्व शिवसैनिक आणि जनतेचा आभारी आहे. महाराष्ट्रासोबत वरळीचा विकास हेच माझे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे मला शुभेच्छा दिल्या आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya thackeray nomination for Maharashtra assembly election 2019 worli