'आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस'; भाजप आमदारांकडून पर्यावरण मंत्र्यांची खिल्ली...

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

विरोधी पक्षनेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांवर डिझास्टर टूरीझम अशी टीका करणाऱ्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार अमित साटम यांनी खिल्ली उडवली असून आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस, असा टोला लगावला आहे. 

मुंबई ः विरोधी पक्षनेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांवर डिझास्टर टूरीझम अशी टीका करणाऱ्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार अमित साटम यांनी खिल्ली उडवली असून आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस, असा टोला लगावला आहे. 

वाचा -  तेवढेच सांगा साहेब, प्रवचने नकोत...सामनातून देवेंद्र फडणवीसांना टोला

 कोरोनाच्या फैलावासंदर्भात राजकीय नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टोलेबाजी सुरूच ठेवली असून सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी आदित्य ठाकरे यांची अवस्था झाल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तर धारावीच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही संघावर टीका केली आहे. 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे फक्त घरात बसून बेफाम विधाने करीत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे धाडस दाखवा. वरळी कोळीवाडा हॉटस्पॉट असताना तुम्ही तेथे तळ ठोकून होतात असा एकतरी फोटो दाखवा. तुम्ही अजून कोषात आहात, तेव्हा निदान तोंड तरी बंद ठेवा, अशी टीका साटम यांनी केली आहे. 

वाचा - ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोना झाल्याचं कळाल्यावर विवेक ऑबेरॉयने केलं ट्विट.. - 

तर प्रवीण दरेकरही यांनीही ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. जनतेमध्ये जाऊन त्यांचे सुख-दु:ख समजून त्याचे नियोजन करणे, उपाययोजना करणे हे सरकारचे, मंत्र्यांचे कर्तव्य आहे. ते करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उंटावरून शेळ्या हाकण्याचा सरकारचा कारभार सुरु आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी जाऊन जर रुग्णांची, जनतेची दुःख समजून घेत असतील आणि तेथे सुव्यवस्था आणण्यासाठी मदत करत असतील तर त्यावर टिका करणे, हे सरकारला पोटशूळ उठल्याचे लक्षण आहे. त्या उद्वीग्नतेतून पर्यटनमंत्री अशी विधाने करीत आहेत, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे.

वाचा -  मालिकांचे शूटिंग सुरू झाले परंतु, तांत्रिक कामगार, ज्युनियर आर्टिस्टचे प्रश्व प्रलंबित...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमुळे धारावीतील कोरोना कमी झाल्याच्या भाजप नेत्यांच्या विधानांवर रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. कोरोना वाढला तर तो ठाकरे सरकारमुळे आणि कमी झाला तर आरएसएस मुळे, असं कसं चालेल. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आरएसएस चं तेवढंच योगदान आहे, जेवढं त्यांचे योगदान स्वातंत्र्यलढ्यात होतं. आरएसएस ने चीनविरुद्धही लढा पुकारावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Aditya, you are still in the treasury'; BJP MLA criticizes environment minister