advt
advt

बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...

मुंबई : प्रसारमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिरातींमध्ये बिनबुडाचे, अवास्तव दावे आहेत का हे पाहणाऱ्या 'अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया'ने लॉकडाऊन काळातही अशा जाहिरातींना चाप लावला आहे. वॉटरप्रुफिंगच्या एका जाहिरातीत तर स्वाभाविकपणे बाळ रडले अन 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात सापडली, असेही घडले. 

कोरोनाच्या फैलावातही कौन्सिलच्या पथकाने आपले काम पूर्वीच्याच जोमाने केले. मार्च व एप्रिल महिन्यात कौन्सिलने 533 जाहिराती तपासल्या. त्या जाहिरातींविरोधातल्या 377 तक्रारी वैध ठरविण्यात आल्या, त्यातील 115 जाहिराती लगेच मागेही घेण्यात आल्या. लोकांची दिशाभूल करणारे दावे जाहिरातींमध्ये नसावेत, लोकांचा गैरसमज होईल, अशा जाहिराती सेलिब्रिटींनी करू नयेत, असाही कौन्सिलचा प्रयत्न असतो. 

गच्ची वॉटरप्रूफिंग करण्याचे काम नीट होत नसल्याने पत्नी प्रचंड संतापते आणि पतीच्या श्रीमुखात लगावते, ही जाहिरात हिंसेला उद्युक्त करणारी व अवमानकारक आहे, असा ठपका ठेवण्यात आला. जाहिरात विनोदी ढंगाची आहे, असा बचाव जाहिरातदारांनी घेतला. मात्र, जाहिरातीत पत्नी एवढी संतापलेली असते की तिच्या कृतीने तिच्या हातातले जेमतेम एक-दीड वर्ष वय असलेले मूलही स्वाभाविकपणे घाबरून रडायला लागते (त्याला रडायला कोणीही सांगितले नसूनही) हे पाहून तर जाहिरातदाराचा विनोदी जाहिरातीचा दावा मान्य होऊच शकत नाही, असे बजावण्यात आले. 

लॉकडाऊन असेल, पण पोटाला कुलुप कसे लावणार? अनेकांनी शोधला वेगळा मार्ग

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना, आमचे औषध कोरोनावर खात्रीशीर उपचार करू शकते किंवा त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध होतो, असा गैरसमज पसरवणाऱ्या जाहिरातींविरोधातही कौन्सिलने मोहीम उघडली. अशा जाहिराती कोठेही प्रसिद्ध झाल्या तर त्याची माहिती आम्हाला द्या म्हणजे आम्हीही त्याबाबत कारवाई करू, असे आयुष मंत्रालयानेही कौन्सिलला सांगितले होते. आमचे औषध कोरोनावर हमखास उपचार करणारे आहे, असे सांगणाऱ्या पन्नास चुकीच्या जाहिराती कौन्सिलने शोधल्या व त्या एका आठवड्यात मागे घेण्याचा आदेश दिला. 

माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ खाण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, कारण आमच्याकडे अमुक-तमुक तेलात पदार्थ तळले जातात, ही जाहिरातही दिशाभूल करणारी आहे, असा ठपका कौन्सिलने ठेवला. कारण या तेलात तळलेले पदार्थ तब्येतीला हानीकारक ठरत नाहीत याचे कोणतेही शास्त्रीय, रासायनिक, वैद्यकीय, कायदेशीर पुरावे जाहिरादारांनी दिले नाहीत. तसेच जाहिरातीत आपण केलेला दावा खरा आहे का? याची खातरजमा ती जाहिरात करणाऱ्या त्या सेलिब्रिटी दांपत्यानेही केला नव्हता, असेही कौन्सिलला आढळून आले.
 

अमके-तमके क्रीम वापरून त्वचेला एचडी ग्लोव्ह मिळतो हा दावा करणाऱ्या जाहिरातीत प्रत्यक्ष इमेज एनहान्सिंग इफेक्ट वापरले होते, असे दिसून आले. मधात साखर घातली नाही, किंवा सरबतात रसायने-प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत, आमच्या प्रसूतिगृहात वेदनारहित बाळंतपण होते, असे दावे करणाऱ्या जाहिरातींनाही कौन्सिलने चाप लावला, असे कौन्सिलचे अध्यक्ष रोहित गुप्ता यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com