70 वर्षांवरील नागरिकांच्या चाचणीसाठी बीएमसीचा नवा नियम; जाणून घ्या महत्वाची माहिती

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 25 June 2020

कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत

 

मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पालिकेनं चाचणीच्या नियमात आणखी एक बदल केला आहे. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) आता 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्वांची कोविड-19ची चाचणी प्रिस्क्रिप्शनविना घेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी बीएमसीने डॉक्टरांना शारीरिक तपासणीविना चाचणी केल्यास नियम तोडण्याच्या अंतर्गत कारवाईचा इशारा दिला होता. आता या नियमांचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला पालिकेन घेतला आहे. तसंच ई-प्रिस्क्रिप्शनलाही चाचणी घेण्यास परवानगी दिली जाईल, असं नमूद केलं आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, या काळात ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. आम्ही नियम शिथिल केले आहेत जेणेकरून 70 वर्षांपेक्षा जास्त लोकांची चाचणी घेता येईल. त्यांना कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता भासणार नाही.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 22 जूनला नोंदवलेल्या 3,735 मृतांपैकी 2,669 मृत्यू हे 50 ते 80 या वयोगटातील आहेत. एकूण मृत्यूंपैकी हे प्रमाण 71 टक्के आहे. मृत्यू दर कमी करण्याच्या प्रयत्नात, प्रशासनानं कंटेन्मेंट झोन आणि कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात ज्येष्ठ नागरिकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासणं सुरू केले.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आतापर्यंत 4.18 लाख ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 99 टक्के लोकांकडे ऑक्सिजन पातळी 95 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मंगळवारी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग सुरू केली असून त्या अंतर्गत पालिकेनं जलद चाचणीसाठी एक लाख अँटीजेन टेस्टिंग किट खरेदी केले आहेत. हे किट अर्ध्या तासाच्या आत रिपोर्ट देऊ शकतात. 

मुंबई महापालिकेचं 'मिशन झिरो'

मिशन झिरो अंतर्गत शून्य कोरोना रुग्ण लक्ष्य गाठण्यासाठी डॉक्टर आणि औषधांसह 50 फिरत्या दवाखान्यांची वाहने (मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन) मुलुंड, भांडुप, अंधेरी, मालाड, बोरिवली, दहिसर आणि कांदिवली या परिसरांमध्ये जाऊन रुग्णांची प्राथमिक तपासणी करतील. त्यांना औषधेही देण्यात येतील. येत्या दोन ते तीन आठवडे ही मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येईल. या भागातील रुग्णांची तपासणी सातत्याने करण्यात येणार असून यातून कोरोना संशयित रुग्णांना वेगळे करून त्याच परिसरात त्यांची चाचणी केली जाईल. कोरोनाबाधितांचा वेळेवर शोध घेऊन उपचार करण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

या मोहीमेसाठी पालिका प्रशासनासोबत स्थानिक डॉक्टर तसेच भारतीय जैन संघटना, देश अपनाये, क्रेडाई-एमसीएचआय मदत करत आहेत. या संघटना कोणत्याही प्रकारचा मोबदला घेणार नाही आहे. सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर फिरते दवाखाने वाहने, डॉक्टर आणि औषधे संस्थांमार्फत तर चाचणी आणि विलगीकरण व्यवस्था पालिकेकडून करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc now those over 70 years can undergo covid testing without prescription