ठाणे स्थानक एक नंबर, 15 वर्षानंतर ठाणे स्थानकाला मिळाला 'हा' मान..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

ठाणे रेल्वे स्थानक स्वच्छतेत अव्वल 

ठाणे : ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानक स्वच्छतेत अव्वल ठरले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत स्थानकाची नियमित स्वच्छता ठेवली जात असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई विभागात यंदाचा स्वच्छतेचा "बेस्ट रेल्वेस्थानक पुरस्कार' ठाणे स्थानकाला प्राप्त झाला आहे. पुरस्कार म्हणून ठाणे स्थानकाला मानाची शिल्ड (फिरती ढाल) प्रदान करण्यात आल्याची माहिती ठाणे स्थानक प्रबंधक आर. के. मीना यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी :  ...नाहीतर मुंबई पेटायला वेळ नाही लागणार!

देशातील पहिली रेल्वे धावलेल्या ठाणे रेल्वेस्थाकातून दररोज तब्बल सात लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातून मध्य रेल्वेच्या 782 अप-डाऊन आणि ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर 282 अप-डाऊन उपनगरी गाड्या तसेच, 80 अप आणि 70 डाऊन अशा मेल-एक्‍स्प्रेस धावतात; तर ठाणे स्थानकातून नियमित 3.50 लाख उपनगरी प्रवासी तिकिटांची विक्री होते. त्यामुळे ठाणे स्थानकावर अहोरात्र वर्दळ असते. तरीही ठाणे स्थानकातील स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष दिले जात असल्याने या स्थानकाला यंदाचा स्वच्छतेचा अव्वल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत देशभरातील 16 रेल्वे झोनमधील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा "क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया' या संस्थेमार्फत घेतला जातो. या पार्श्‍वभूमीवर "स्वच्छ रेल्वे... स्वच्छ भारत' अशी मोहीम केंद्र सरकारने राबवली. त्यानुसार, स्वच्छता अभियानदेखील राबवण्यात येते. याशिवाय स्थानकात ठिकठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवून जागोजागी "थोडी तरी ठेवा जाण... रेल्वे आपली होणार नाही घाण' अशा आशयाचे स्वच्छतेचे फलकदेखील झळकवले आहेत, अशी माहिती स्थानक प्रबंधक मीना यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी : पीएनबीनंतर आता ‘...या’ बॅंकेच्या ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

15 वर्षांनी पुरस्कार 
मध्य रेल्वेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 16 एप्रिल 2004 ला भारतीय रेल्वेचा 166 वा वर्धापनदिन आयोजित केला होता. या कार्यक्रमात ठाणे स्थानकाला यंदाचा 'स्वच्छ स्थानका'चा पुरस्कार मध्य रेल्वेचे डीआरएम संजयकुमार जैन यांच्या हस्ते देण्यात आला. फिरती शिल्ड आणि रोख दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. उत्कृष्ट स्वच्छतेसाठी 2004 नंतर तब्बल 15 वर्षांनी हा पुरस्कार ठाणे स्थानकाला प्राप्त झाला आहे.  

WebTitle : after fifteen long years thane station gets this award


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after fifteen long years thane station gets this award