पीएनबीनंतर आता ‘...या’ बॅंकेच्या ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

कर्नाळा बॅंकेचे ठेवीदार हवालदिल
कर्नाळा बॅंकेचे ठेवीदार हवालदिल

नवी मुंबई : अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांची रक्कम देण्याच्या आश्‍वासनावर बोळवण केली जात आहे. बॅंक व्यवस्थापनाच्या या वेळकाढूपणामुळे ठेवीदार मेटाकुटीला आले आहेत. त्यांनी हे प्रकरण धसास लावण्यासाठी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समिती स्थापन केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आगामी काही दिवसांत तापण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

पनवेलमध्ये स्थापना झालेली कर्नाळा नागरी सहकारी बॅंक आर्थिक संकटात अडकली आहे. बॅंकेतून मोठ्या रकमांची ५९ कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा ठपका रिझर्व्ह बॅंकेने एप्रिल महिन्यातच ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त; पुणे यांच्यामार्फत रिर्झव्ह बॅंकेने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. वाटप केलेल्या कर्जांची छाननी करून हा आहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना आरबीआयने सहकार आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षक यू. जी. तुपे यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली होती. मात्र तुपे यांनी अहवाल सादर करण्यात वेळकाढूपणा केला. अखेर बॅंकेचे प्रकरण तापल्यामुळे नोव्हेंबरअखेरीस थातुरमातुर चौकशी करून अहवाल सादर केला. त्यामध्ये रिझर्व्ह बॅंकेने ठपका ठेवलेल्या ५९ कर्जांच्या कागदपत्रांबाबत फारसे उल्लेख टाळण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे बोगस कर्जेवाटपाची वसुली अधांतरी राहण्याची भीती खातेदारांमधून व्यक्त होत आहे. याबाबत बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी संपर्क झाला नाही. 

१६ डिसेंबरचा वायदा फसला 
कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेचा जुलै २०१९ पर्यंतचा व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर बॅंकेने खातेदारांना बॅंकेत रोख रकमा काढण्यावर नियंत्रण आणले. फक्त दहा हजार रूपये देण्यात येत होते. सप्टेंबरअखेर ही सवलत 3 हजार रूपयांवर आली. सप्टेंबर महिन्यानंतर बॅंकेतर्फे वायदेबाजार सुरू झाला. कधी आठवड्याने; तर कधी १५ दिवसांनी रक्कम देतो, अशी आश्‍वासने बॅंकांच्या विविध शाखांमधील अधिकाऱ्यांनी दिली. अखेरचा वायदा १६ डिसेंबरचा देण्यात आला होता. त्यानुसार सर्वच शाखांमध्ये खातेदार व ठेवीदारांनी गर्दी केली होती. परंतु त्या दिवशीसुद्धा पाच हजार रुपये देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केला. 

समिती आक्रमक 
कर्नाळा बॅंकेच्या ठेवीदारांनी न्याय मिळवून देण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीची स्थापना केली आहे. नुकतीच या समितीची बैठक पनवेलमध्ये झाली. त्या वेळी ठेवीदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात बॅंक काय करत आहे, याबाबत खुलासा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. रिझर्व्ह बॅंकेने उघड केलेल्या ५९ नियमबाह्य कर्जदारांची यादी आणि संबंधित कर्जे वसुलीसाठी केलेल्या कारवाईचा तपशील हे १५ दिवसांत समितीपुढे देण्याचे पत्र अध्यक्ष विवेक पाटील यांना दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com