हिरवा, गुलाबीनंतर आता निळा रंग! डोंबिवली MIDCतील प्रदूषणाची समस्या गंभीर

हिरवा, गुलाबीनंतर आता निळा रंग! डोंबिवली MIDCतील प्रदूषणाची समस्या गंभीर

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्येने येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) रासायनिक प्रदूषणामुळे परिसरातील रस्ते, गटारातील पाणी हिरवे, गुलाबी झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. आता शुक्रवारी (ता. 27) सकाळी एमआयडीसीतील गटारांमधून चक्क रसायनमिश्रित निळे पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्याला उग्र वासही येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिसराची पाहणी करत प्रदूषण रोखा अन्यथा कंपन्यांना टाळे लावा, असे आदेशही दिले होते. आता शहरे अनलॉक होताच प्रदूषणाच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. 

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे, तसेच रसायनमिश्रीत पाण्यामुळे निवासी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे एमआयडीसीत हिरवा, नारंगी पाऊस, त्यानंतर रसायनामुळे गुलाबी झालेले रस्ते यापूर्वी पाहिले आहेत. या रसायनांच्या उग्र वासामुळे डोके दुखी, डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास अडचणी आदी गोष्टींचा त्रास नागरिकांना होतो. याविषयी तक्रार केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमआयडीसी परिसराची पाहणी करून प्रदूषण रोखा, नाही तर कंपन्यांना टाळे लावा, असे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एमआयडीसीने रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना नोटिसाही बजावल्या. परंतु त्याचा काही एक परिणाम कंपन्यांवर झाल्याचे दिसून आले नाही. 

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कंपन्या सुरू होताच प्रदूषणाच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी सकाळी एमआयडीसी फेज-2 मधील कल्याण-शीळ सेवा रस्त्यावर निळ्या रंगाचे रसायनमिश्रीत पाणी वहात होते. परिसरात दुर्गंधी पसरल्याने काही स्थानिक नागरिकांनी पहाणी केली असता त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. या पाण्याचे व्हिडीओ काढीत ते स्थानिकांनी समाज माध्यमावर व्हायरल केले. यानंतर दुपारी पाणी सुकल्यानंतर येथील रस्त्याला नीळा रंग प्राप्त झाल्याचे दिसून आले. परिसरातील गटारात तसेच रस्त्यावर रासायनिक कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी सोडण्याच्या घटना वारंवार घडतात. परंतु याकडे एमआयडीसी अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. 

अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काहीही होणार नाही का ? - 
डोंबिवली एमआयडीसी परिसरात वारंवार प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमआयडीसी परिसरातील प्रदूषणामुळे गुलाबी झालेल्या रस्त्यांची पाहणी केली होती. त्यावेळी मनसेच्या वतीने त्यांना एक निवेदन व काही उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या. शुक्रवारीही डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मधील रस्त्यावर गटारातील रसायनमिश्रीत सांडपाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काहीही होणार नाही का? अस थेट सवालच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना ट्विटरद्वारे विचारला आहे. 

After green, pink, now blue Pollution problem at Dombivli MIDC is serious

--------------------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com