पाऊस तर ओसरला; मुंबईत आता मात्र डेंगी, लेप्टोचा वाढता धोका

संजय घारपुरे
Friday, 7 August 2020

आजपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी गेले दोन दिवस पाणी शहरात साचून राहल्याने आता नवे आजार डोके वर काढण्याची शक्यता असून आता डेंगी, लेप्टोचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई : गेले दोन दिवस मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळित झाले होते. रेल्वे स्थानक, हॉस्पिटलमध्येही पाणी शिरल्याने मोठी गैरसोय मुंबईकरांना सहन करावी लागली. अनेक भागात पाणी पावसाचे पाणी घरात तसेच दुकानात शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पावसासोबतच जोरदार वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी भलीमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचेही मोठे नुकसान झाले. आजपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी गेले दोन दिवस पाणी शहरात साचून राहल्याने आता नवे आजार डोके वर काढण्याची शक्यता असून आता डेंगी, लेप्टोचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अखेर बिहारचे एसपी विनय तिवारी 'बॅक टू पॅव्हेलियन'

मुंबईतील पावसाच्या तुफानी खेळीनंतर डेंगीचे रुग्ण वाढण्याचा धोका असतो. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगी होणारे डास वाढतात, तर मलेरियाचे डास साचलेल्या घाण पाण्यात वाढतात. तसेच साचलेल्या पाण्यात उंदीर, घुशींची घाण मिसळल्याने त्यातून लेप्टो आजार होण्याचा धोका असतो. जुलै महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले होते, पण लेप्टो आणि डेंगीच्या रुग्णात गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. यंदा जुलैत लेप्टोचे 14 तर डेंगीचे 11 रुग्ण आढळले. गतवर्षी जुलैत लेप्टोचे 74 आणि डेंगीचे 29 रुग्ण होते, याकडे महापालिका आधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्याचे वृत्त आहे. 

मुसळधार पावसाचा फटका 'कोविड केअर सेंटर'ला, रुग्णांचे प्रचंड हाल

आत्तापर्यंत मलेरियाचे रुग्ण असले तरी डेंगी, लेप्टो, एच1एन1, हेपाटायटीस, गॅस्ट्रोचे रुग्ण आटोक्यात होते. ताप आलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी घेतानाच त्यांची मलेरियाही चाचणी करण्याची सूचना महापालिका प्रशासनाने रुग्णालये तसेच दवाखान्यांना केली आहे. यंदाच्या मे महिन्यात मलेरियाचे 163 रुग्ण आढळले होते. मात्र, त्यानंतर त्यात वाढ झाली. जूनमध्ये 328, तर जुलैत 872 रुग्ण होते. याचवेळी मे महिन्यात लेप्टोची लागण एकास झाली होती, तर डेंगी तिघांना झाला होता. जूनमध्ये एकास लेप्टो, तर चौघांना डेंगी झाला होता. बृहन्मुंबई महापालिकेने यंदा डासांची व्युत्पत्तीची होणारी ठिकाणी 66 हजार 428 तपासली होती. त्या तपासणीच्यावेळी 5 हजार 144 ठिकाणी नष्ट केली होती.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after heavy rains in mumbai, there may be chances of lepto and dengue patients