मनसेनंतर शिवसेना आक्रमक, जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला

पूजा विचारे
Wednesday, 28 October 2020

मराठी भाषेबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जान कुमार सानूला चांगलाच धमकीवजा इशारा दिला. आता मनसेनंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. 

मुंबईः  सध्या बिग बॉसचा १४ वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये दररोज नवनवे वाद होत असतात. स्पर्धकांची एकमेकांसोबत रोजचं भांडणं सुरु असतात. आता शोमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्यात जोरदार वाद सुरु झाला आहे. या वादा दरम्यान जान कुमार सानूनं मराठी गायक राहुल वैद्य याच्या शाब्दिक हल्लाबोल केला. मात्र यावेळी त्याने मराठी भाषेबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जान कुमार सानूला चांगलाच धमकीवजा इशारा दिला. आता मनसेनंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. 

मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी जान कुमार सानूला बिग बॉसमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. 

कलर्स वाहिनीने जर मुजोर जान कुमार सानू याची बिग बॉसच्या शोमधून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तसंच   सलमान खानने स्पर्धकांना योग्य ती समज द्यावी, असं आवाहन देखील सरनाईकांनी केलं आहे.

दरम्यान शोमध्ये स्पर्धक जान कुमार सानूकडून मराठी भाषेचा अपमान झाल्याप्रकरणी कर्लस वाहिनीनं माफी मागितली आहे. पत्रक प्रसिद्ध करुन वाहिनीनं झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तसंच अपमानास्पद वक्तव्य एपिसोड आणि सोशल मीडियावरुन काढून टाकलं जाईल अशी ग्वाहीही वाहिनीनं दिली आहे. 

अधिक वाचा-  तुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा

नेमकं प्रकरण काय 

खेळादरम्यान एक वाद झाला. या वादा दरम्यान जान कुमार सानूनं निक्की तांबोलीसोबत बोलताना मराठी भाषेची चीड येते असं म्हटलं. निक्कीनं जानसोबत मराठी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जान तिला म्हणाला की, माझ्याशी मराठीत बोलायचे प्रयत्न करु नकोस. माझ्यासोबत बोलायचे असेल तर हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असं तो म्हणाला.

बिग बॉसच्या १४ व्या सिझनमध्ये मराठी गायक राहुल वैद्यही सहभागी झाला आहे. जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्यात सुरुवातील घट्ट मैत्री होती. काही कारणानं त्यांच्या मैत्रीत फूट पडली. त्यानंतर निक्कीनं जानची मैत्री सोडून राहुलसोबत मैत्री केली.

After Mns Shivsena pratap sarnaik warns bigg boss jan kumar sanu marathi language comment


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Mns Shivsena pratap sarnaik warns bigg boss jan kumar sanu marathi language comment