Mumbai : मिरा-भाईंदरमधील हवेची गुणवत्ता सुधारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मिरा-भाईंदरमधील हवेची गुणवत्ता सुधारणार

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील हवेचे प्रदूषण तपासण्याची कोणतीही यंत्रणा सध्या पालिकेकडे नाही. दर वर्षी बाहेरच्या एखाद्या संस्थेकडून शहरातील प्रदूषणाची स्थिती तपासून घेतली जाते; मात्र यापुढे शहरातील प्रदूषणाची दररोजच्या पातळीची नोंद आणि ती दूषित असल्यास त्यात सुधारणाही पालिकेला करता येणार आहे. केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीमधून विविध उपाययोजना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरात ठिकठिकाणी हवेची गुणवत्ता दर्शवणारे डिजिटल फलक बसवण्यात येणार आहेत. या फलकांसोबतच हवेची गुणवत्ता तपासणारे यंत्र बसवण्यात आलेले असते. त्याद्वारे हवेतील कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हवेतील धुळीचे प्रमाण तसेच इतर घटक मोजले जाणार आहेत आणि डिजिटल फलकावर त्यांची दररोज नोंदही दिसणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी हे फलक बसवण्याची पालिकेची योजना आहे.

पालिका एअर सेपरेशन यंत्रदेखील खरेदी करणार आहे. हे यंत्र हवेतील धूळ शोषून घेण्याचे काम करते. शोषून घेतलेली धूळ यंत्रातील पाण्याच्या प्रवाहात मिसळली जाऊन ती बाहेर सोडण्यात येते. त्यामुळे धुळीचे प्रमाण कमी होते आणि गुणवत्ता सुधारते. या यंत्रासाठी आयआयटी मुंबईकडून प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.

वित्त आयोगाकडून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेला निधी मिळाला आहे. या निधीमधून पालिकेच्या इमारतींचे कामकाज सौरऊर्जेवर चालवणे, महापालिकेसाठी ई-वाहने खरेदी करणे तसेच या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणे आदी उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

- संजय शिंदे, उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

loading image
go to top