'त्या' प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज अजित पवार-संभाजीराजे यांच्यात बैठक

पूजा विचारे
गुरुवार, 9 जुलै 2020

सारथी प्रकरणावरून अधिक वाद वाढण्याआधी राज्य सरकारनं या प्रकरणावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात आज बैठक बोलावण्यात आली आहे. आज संभाजीराजे छत्रपती मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणारेत. 

मुंबई- राज्यात सध्या  पुण्यातील 'सारथी' संस्थेच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे.  गैरव्यवहाराच्या आरोपांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात सारथी संस्था चर्चेत आहे.  काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे   खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे हा सारथी या संस्थेचा वाद आता पेटला आहे. सारथी प्रकरणावरून अधिक वाद वाढण्याआधी राज्य सरकारनं या प्रकरणावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात आज बैठक बोलावण्यात आली आहे. या  मुद्यावरुन आज संभाजीराजे छत्रपती मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणारेत. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना फोन करून आज होणाऱ्या या बैठकीला येण्याचे निमंत्रण दिलं.  सारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज गुरुवारी मुंबई बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

मी ओबीसी असल्यामुळेच मराठा क्रांती मोर्चा माझा विरोध करतं आहे, जर असे राजकारण होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडून पदभार काढून घ्यावा, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं होतं.  त्यावर शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, असं म्हणत वडेट्टीवार यांना संभाजीराजेंनी टोला लगावला होता.

हेही वाचा- आर्थर रोड कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांची 'सक्सेस स्टोरी'

सारथी मधील विद्यार्थ्यांना योग्य मदत होत नसल्याचा आरोप संभाजी राजे यांनी केला होता. मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या आणि प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभे केले आणि दबाव निर्माण केला, त्याचा आदर करत सरकारनं चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.संभाजीराजे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली होती. 

काही महिन्यांपूर्वी समाजाच्या वतीने पुण्यात सारथी कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी जी आश्वासने सरकारने दिली होती, ती न पाळल्याचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय घेत आहे. माझ्यासाठी समाजाचे हित सर्वोच्च असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

संभाजी राजेंनी खालील प्रमुख मागण्या जाहीर केल्यात 

  • सारथी ही 'स्वायत्त' संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्तते बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 
  • जे अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढले ते सर्व रद्द केले पाहिजेत. 
  • शासनाने कथित गैरव्यवहाराची चौकशी केली, तिच्या मध्ये काही तथ्ये आढळली का? किती रुपयांचा घोटाळा झाला? हे शासनाने जाहीर करावे. झालेला सर्व जमाखर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथीची जाणीव पूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. 
  • तारदूत प्रकल्प हा समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये. उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी. 
  • ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी.
  • शासनाने नवीन कोण कोणत्या योजना कल्पिल्या आहेत, त्या जाहीर करण्यात याव्यात.
  • गरीब मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली ही संस्था स्वायत्त तर राहिली पाहिजेच. पण तिला जास्तीत जास्त निधी दिला गेला पाहिजे,  असेही संभाजीराजेंनी नमूद केले आहे.

ajit pawar chhatrapati sambhaji raje meet today sarthi mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar chhatrapati sambhaji raje meet today sarthi mumbai