अलिबाग एसटी स्थानक लाल फितीत; भूमिपूजनाच्या सव्वा वर्षानंतरही कामाला मुहूर्त नाही

प्रमोद जाधव
Friday, 27 November 2020

एसटी बस स्थानकाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गेल्या वर्षी मोठ्या थाटात करण्यात आले होते. सव्वा वर्षानंतरही या कामाला मुहूर्त मिळाला नाही.

अलिबाग : जिल्ह्याचे ठिकाण असलेले अलिबाग काही वर्षांपासून पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे. त्यामुळे येथील वाढती वर्दळ लक्षात घेऊन एसटी बस स्थानकाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गेल्या वर्षी मोठ्या थाटात करण्यात आले होते. सव्वा वर्षानंतरही या कामाला मुहूर्त मिळाला नाही. मंत्रालय स्तरावर हा प्रकल्प लालफितीत अडकला आहे. अलिबाग स्थानक हे तब्बल 59 वर्षे जुने आहे; तर नूतनीकरण फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. 

हेही वाचा - वसई विरारमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य; कचरा वर्गीकरणावर पालिकेचे दुर्लक्ष

अलिबाग स्थानकाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला. त्याच वर्षी मे महिन्यात स्थानकातील माती परीक्षण पुणे येथील डिरोक्‍ट्रीक इंजिनिअरिंग या कंपनीकडून करून इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याप्रमाणे तळ मजला व पहिला मजला अशा पद्धतीने स्थानक आहे. तळ मजल्यामध्ये 14 फलाट आहेत. प्रवाशांसाठी खास प्रतीक्षालय, उपाहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक कार्यालय असणार आहे. तसेच पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष असणार आहेत. सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करण्याची क्षमता नव्या स्थानकात असणार आहे. 7 हजार 630 चौरस फूट इतक्‍या क्षेत्रावर नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा कोटी 28 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. बाहेर जाण्याचा व आतमध्ये येण्याचा एसटी बसचा मार्ग वेगळा असून प्रवाशांसाठीही वेगळा मार्ग आहे. या आराखड्यानुसार तयार करण्यात येणाऱ्या स्थानकाच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या 28 ऑगस्ट 2019 या दिवशी थाटामध्ये पार पडला. 

हेही वाचा - तुळशी विवाहाचे आमंत्रण सुरु; लग्न पत्रिका सोशल माध्यमात व्हायरल

हे काम 18 महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी 2021 पर्यंत काम होणे अपेक्षित होते. मात्र 15 महिने होऊनही या स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली नाही. स्थानकाच्या कामाची निविदा 19 सप्टेंबरला मागविण्यात आली होती. निविदा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्या; परंतु अजूनपर्यंत मंत्रालय स्तरावर त्याला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती कुर्ला येथील कार्यकारी अभियंता कार्यालयातून मिळाली. लाल फितीत अडकलेल्या या कामामुळे अलिबागकरांना नव्या स्थानकाची अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा-  घाटकोपरमध्ये बनावट तेलाचा साठा जप्त, FDAचा तेलाच्या दुकानावर छापा

नियोजित बसस्थानकावर दृष्टिक्षेप 
क्षेत्रफळ
: 19 हजार 530 चौरस मीटर 
खर्च अपेक्षित : सहा कोटी 28 लाख रुपये 
वास्तुविशारद : गोडबोले मुकादम ऍण्ड असोसिएट्‌स 
इमारतीतील ठळक बाबी : फलाट-14, प्रवासी प्रतीक्षालय, उपाहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल रुम, हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष व स्थानक प्रमुख कार्यालय. 

Alibag ST station work stopped Even after a quarter of a year of land worshi

-----------------------------------------------------------\

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alibag ST station work stopped Even after a quarter of a year of land worship