esakal | "समझने वाले को..."; भाजप नेत्याचं सूचक ट्वीट
sakal

बोलून बातमी शोधा

Atul-Bhatkhalkar

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अनपेक्षित गोष्टी घडत आहेत.

"समझने वाले को..."; भाजप नेत्याचं सूचक ट्वीट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना तपासणीसाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही बातमी दिल्यानंतर पवार यांची प्रकृती लवकर बरी होवो, यासाठी सर्व स्तरातून त्यांना सदिच्छा देण्यात आल्या. भारतरत्न लता मंगेशकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे समजले. मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून प्रकृतीची विचारणा करण्यात आली नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केलं.

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृतीबाबत राजेश टोपेंनी दिली माहिती

"दिल्लीतील काँग्रेसच्या एकाही नेत्याने विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत फोन केला नाही... समझने वाले को इशारा काफी है...", असं ट्वीट त्यांनी केलं. काँग्रेसच्या वरच्या फळीतील नेत्यांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून सुचवलं.

दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. 31 मार्च रोजी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पोटात दुखू लागल्यानं त्यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा केलेल्या तपासणीमध्ये त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

loading image