फुप्फुसाबरोबर आता कोरोनाचा मेंदूवरही आघात! वोक्‍हार्ट रुग्णालयात स्पीच थेरपीद्वारे रुग्णावर यशस्वी उपचार

फुप्फुसाबरोबर आता कोरोनाचा मेंदूवरही आघात! वोक्‍हार्ट रुग्णालयात स्पीच थेरपीद्वारे रुग्णावर यशस्वी उपचार

मुंबई : फुप्फुसाशी संबंधित असणारा कोव्हिड- 19 आजार आता मेंदूवरही आघात करू लागला आहे. एका 48 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला मेंदूचा झटका (ब्रेन स्ट्रोक) आल्याचे समोर आले आहे. स्ट्रोकमुळे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने त्याला बोलताही येईना. अशा स्थितीत मुंबई सेंट्रलच्या वोक्‍हार्ट रुग्णालयात त्याच्यावर स्पीच थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. परिणामी रुग्ण कोरोनातून बरा होऊन आता सर्वसामान्य आयुष्य जगू लागला आहे. 

तिरुपती स्वामी (48) असे रुग्णाचे नाव असून ते उल्हासनगरमधील रहिवासी आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये ते कार्यरत आहेत. काही दिवसांपासून त्यांना ताप, खोकला, अंगदुखी आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. प्रकृती अधिकच बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना वोक्‍हार्ट रुग्णालयात दाखल केले. 8 ऑगस्ट रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. ते रुग्णालयात आले तेव्हा त्यांना बोलताही येत नव्हते. एमआरआय चाचणीत मेंदूच्या डाव्या अर्ध्या भागात स्ट्रोक असल्याचे निदान आले. त्यांच्यावर स्पीच थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. 

"वोक्‍हार्ट'चे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखिजा म्हणाले, की संबंधित रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातच मेंदूचा झटका आल्याने त्यांना बोलता येत नव्हते. संवाद साधतानाही अडचणी येत होत्या. वैद्यकीय भाषेत त्याला "अप्सिया' म्हणतात. अशा परिस्थितीत रुग्णांवर मेलोडिक इनटोनेशन थेरपी (एमआयटी) द्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. ही थेरपी शब्द आणि अर्थपूर्ण भाषा सुधारण्यास मदत करते. "कोरोना विषाणूंबाबत नागरिकांमध्येही जागरुकता वाढू लागली आहे. मेंदूचा स्ट्रोक अतिशय गंभीर समस्या आहे. त्यावर वेळीच निदान व उपचार गरजेचे आहेत. उपचारास विलंब झाल्यास याचा परिणाम अवयवांवर आणि भाषेवर होऊ शकतो,' असेही डॉ. मखिजा म्हणाले. 

संगीताबाबतची आवड कामी आली 
वोक्‍हार्ट रुग्णालयातील स्पीच थेरपिस्ट नूतन कोरगावकर म्हणाले, की ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने रुग्णाच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. अशा स्थितीत आम्ही त्याच्यावर स्पीच थेरपीद्वारे उपचार केले. संगीत आणि गाण्याबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे कदाचित त्यांच्या संवाद साधण्याच्या क्षमतेत सुधारणा झाली. आता ते सर्वसामान्यांप्रमाणे बोलू लागले आहेत. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com