अमेझॉनचं ऍप मराठीत येणार, मनसेच्या दणक्याने अमेझॉन नरमली

मिलिंद तांबे
Wednesday, 21 October 2020

अमेझॉनने आपलं शॉपिंग ऍप मराठीत न बनवल्यास मानसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिला होता

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्णाण सेनेच्या दणक्याने अमेझॉनने आपले शॉपिंग ऍप मराठी भाषेत आणण्याचा निर्णय घेतला. मनसे शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अमेझॉनने आपलं शॉपिंग ऍप मराठीत न बनवल्यास मानसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिला होता.

अमेझॉन तसेच फ्लिपकार्ट या कंपन्यांनी आपले शॉपिंग ऍप वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये सुरू केले आहे. अमेझॉनने आपले दक्षिण भारतातील शॉपिंग ऍप दक्षिण भारतातील भाषांमध्ये सुरू केले आहेत. महाराष्ट्रात मात्र हे ऍप मराठी भाषेत नसल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली होती.

TRP स्कॅम : हंसा कंपनीच्या आणखी दोन माजी कर्मचाऱ्यांना अटक 

मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी गेल्या गुरूवारी अमेझॉन तसेच फ्लिपकार्टच्या बीकेसीमधील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. शॉपिंग ऍप आठवड्याभरात मराठीत सुरू करण्याची तंबी देण्यात आली होती. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा ही चित्रे यांनी  दिला होता. 

मनसेच्या इशाऱ्यानंतर अमेझॉनच्या युएसमधील कंपनीने मनसेच्या मागणीची दखल घेतली. त्यानंतर आज दिल्ली तसेच पुणे येथील अमेझॉनची लीगल टीम आज मुंबईत दाखल झाली. त्यांनी आज मनसेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आपले ऍप मराठीत सुरू करण्याचे मान्य केले असून पुढील 15 दिवसांत हे ऍप सुरू करण्यात येणार असल्याचे अमेझॉनचे लीगल टीमचे भारतातील प्रमुख विकास चोपरा यांनी सांगितल्याचे चित्रे म्हणाले. 

महत्त्वाची बातमी : आता N95 मास्क मिळणार 19 ते 49 रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीन पदरी मास्क 4 रुपयांना

अमेझॉन तसेच फ्लिपकार्टने महाराष्ट्रात आपले शॉपिंग ऍप सुरू केले आहे. सध्या सण उत्सवांमुळे या कंपन्यांनी मोठ मोठ्या ऑफर्स आणि सवलती आपल्या उत्पादनांवर जाहीर केल्या आहेत. या कंपन्या इथे व्यवसाय करतात मात्र त्यांचे मराठीशी वावडे असल्याने त्यांचे ऍप मराठीत नाहीत. मनसे हे खपवून घेणार नाही. पुढील 15 दिवसात त्यांचे ऍप मराठीत सुरू झाले नाहीत तर मात्र या कंपन्यांची उत्पादने महाराष्ट्रात विकू देणार नसल्याचा इशारा देत फ्लिपकार्ट देखील लवकरच आपले मराठी ऍप सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती अखिल चित्रे यांनी दिली.

( संपादन - सुमित बागुल )

amazon to launch their app in marathi after warning given by MNS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amazon to launch their app in marathi after warning given by MNS