चोराच्या उलट्या बोंबा ! महिलेला घर खाली करण्याची धमकी 

चोराच्या उलट्या बोंबा ! महिलेला घर खाली करण्याची धमकी 

नवी मुंबई, ता. 22 : संचारबंदीच्या काळात महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सकाळच्या प्रतिनिधीला गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कटकारस्थान उघड झाला. सकाळच्या प्रतिनिधीविरोधात आपण तक्रारी अर्ज दिला नसल्याची स्पष्ट कबूली संबंधित महिलेने सकाळला दिलेल्या मुलाखतीत दिली. तसेच आज पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या जबानीतही सकाळबद्दल तक्रार केली नाही.

खारघर परिसरातील पेठ या गावात चंदा पूलजवार ही महिला तिच्या दोन मुलींसह वास्तव्यास आहे. घरोघरी लोकांची धुणी-भांडी करून त्या आपला संसार चालवतात. काही महिन्यांपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातून त्यांची आई लक्ष्मीबाई येलज्जवार (वय 75) वास्तव्यास होत्या. परंतू 20 एप्रिलला सोमवारी त्यांना अत्यवस्थ वाटत असताना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यामुळे पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी चंदा यांनी एका परिचितामार्फत पनवेलमधील एका संस्थेच्या रुग्णवाहिका चालकाशी संपर्क केला. खारघर येथून पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आणि पुढे अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मृतकाच्या नातेवाईकांकडून 10 हजाराची मागणी केली.

कोरोची भीती असल्यामुळे संचारबंदीच्या काळात पुन्हा आपल्या आईचे अंत्यविधी कोण करेल या भीतीपोटी अखेर चंदा यांनी शेजारपाजाऱ्यांकडून उसणे पैसे घेऊन त्या चालकाला दहा हजार रूपये दिले. परंतू हे पैसे त्याला कमी पडल्यामुळे त्याने अतिरीक्त पाच हजारांसाठी तगादा लावला. याबाबत सकाळच्या प्रतिनिधीला माहिती मिळताच त्यांनी दोन्हीकडील बाजू जाणून घेऊन महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. २२ एप्रिलला बातमी प्रकाशित होताच रुग्णवाहिका चालक आणि प्रतिष्ठानविरोधात नागरीकांमध्ये तिखट प्रतिक्रीया उमटल्या. अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत संतापजनक प्रतिक्रीया नोंदवल्या. परंतू पोलिसांनी या घटनेची दखल घेत लोकांची लुट करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला अटक करण्याऐवजी स्वतःची बूद्धी गहाण ठेवून महिलेला न्याय देणाऱ्या सकाळ वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

काय आहे वस्तूस्थिती : 

सकाळ दैनिकात २२ एप्रिलला बातमी प्रकाशित झाल्यानंतर खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अब्रुनुकसानीच्या अदखलपात्र गुन्ह्याबाबत सकाळच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पेठ गावात जाऊन खात्री केली. पेठ गावातील चंदा पूलजवार यांच्या घरी भेट देऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी चंदा पूलजवार यांनी धक्कादायक माहिती दिली. चंदा यांनी सांगितले, की सकाळमध्ये बातमी आल्यानंतर रुग्णवाहिकेवरील चालक इम्रान पुन्हा घरी आला. त्याने घरमालकासोबत येऊन आम्हाला घर खाली करण्याची धमकी दिली. तसेच माझी आणि माझ्या मूलीकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्या कागदावर सकाळ वर्तमानपत्राच्या बातमीदार आणि संपादकांबाबत तक्रार असल्याचे चूकीचे लिहून घेतले. परंतू आमचा सकाळ वर्तमानपत्रावर विश्वास असून त्यांनी आमची कोणतीही बदनामी केलेली नाही.    

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या आहेत. काय तथ्य आहे हे शोधण्यासाठी पोलीस चौकशी करीत असून दोषींवर कारवाई केली जाईल.- अशोक दुधे, पोलीस उपायुक्त. परीमंडळ - २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com