मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिका पडल्या धूळखात; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अजब कारभार

मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिका पडल्या धूळखात; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अजब कारभार

कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेसाठी अनेक रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या रुग्णवाहिका नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र दोन दिवस उलटूनही त्या रुग्णवाहिका पालिका मुख्यालयातच उभ्या आहेत. पूर्वी केडीएमटी बस ही ताफ्यात आल्यानंतर भंगारात, त्याप्रमाणे या रुग्णवाहिका भंगारामध्ये गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अजब कारभार अनेक वेळा समोर आला आहे. 2014-2015 सालात केंद्र आणि राज्य सरकारच्या (जेएनयुआरएन) अंतर्गत शेकडो बस आल्या होत्या. मात्र मनुष्यबळ आणि केडीएमटी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे 60 बस मेट्रो जवळील जागेत उभ्या राहिल्या. त्या शेवटपर्यंत नागरिकांना उपलब्ध झाल्या नाही. सध्या कोरोनाचे सावट असून, कल्याण-डोंबिवलीमध्ये रुग्ण वाहिका उपलब्ध नसल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारींच्या अनुषंगाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. 

त्या रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र त्या पालिका मुख्यालयात चालक नसल्याने उभ्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी समाजमाध्यमांवर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान केडीएमसी मुख्यालयामध्ये रुग्णवाहिका उभ्या असल्याची टीका राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्तयांनी केल्यानंतर पालिका प्रशासनाने या रुग्णवाहिका हटविण्यास सुरुवात केली आहे. 

कल्याण-डोंबिवली परिवहनच्या बस धूळखात पडून खराब झाल्या. त्या भंगारात काढायची वेळ आली? आता मुख्यमंत्री यांच्या हस्ते दोनच दिवसांपुर्वी लोकार्पण झालेल्या रुग्णवाहिका पालिका मुख्यालयात उभ्या आहेत. या वाहिकांमार्फत रुग्णांना सेवा मिळत नाही. 
- इरफान शेख,
सदस्य, नागरी संघर्ष समिती 

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा होऊन त्या पालिकेला हस्तांतरित झाल्या आहेत. तरीही पालिकेने त्या वापरात आणलेल्या नाही. एकीकडे कल्याण-डोंबिवलीत रुग्णवाहिकांचा वानवा असताना नागरिकांना सुविधा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. 
- श्‍याम उबाळे,
सचिव, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना 

पालिकेच्या ताफ्यात रुग्णवाहिका उपलब्ध होताच मनुष्यबळ उभे करून प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि रुग्णालयांमध्ये त्या देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. संबंधित विभागाने अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. 
- रामदास कोकरे,
उपायुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com