
Navi Mumbai अमेरिकेतील महिलेवर नवी मुंबईत कारवाई
नवी मुंबई : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही गेली तीन वर्षे नवी मुंबईत बेकायदा वास्तव्यास असलेल्या एका अमेरिकन महिलेवर नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने कारवाई केली आहे. पोला अंजनाम्मा असे या महिलेचे नाव असून जुलै २०१९ पासून नवी मुंबईत वास्तव्यास असल्याचे चौकशीत आढळून आले होते.
अमेरिकन नागरिक असलेली पोला अंजनाम्मा १० जानेवारी २०१९ रोजी टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. या महिलेला १८० दिवस भारतात राहण्याच्या अटीवर व्हिसा मंजूर करण्यात आला होता. जुलै २०१९ मध्ये व्हिजाची मुदत संपण्यापूर्वी या महिलेला परत जाणे बंधनकारक होते.
मात्र त्यानंतरही महिला तब्बल १,१५० दिवस नवी मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बेकायदा वास्तव्य करत होती. यादरम्यान २१ ऑगस्ट रोजी सीबीडी बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने या महिलेबाबतची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या महिलेवर बेकायदा वास्तव्य केल्याबद्दल दंड ठोठावत कारवाई केली आहे.