मुंबई : अमित शहांचा उद्धव ठाकरेंना आठ वेळा फोन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

एकीचे बळ दाखविण्यासाठी...
मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपप्रणीत ‘एनडीए’ला सर्वच संस्थांनी बहुमताचे अंदाज दिले आहेत. त्यामुळे भाजपसह सर्वच घटक पक्षांत आनंदाचे वातावरण आहे. अशा स्थितीत ‘एनडीए’च्या सर्व प्रमुख नेत्यांनी या बैठकीला उपस्थित राहून एकीचे बळ दाखवावे, अशी अमित शहा यांची रणनीती आहे. त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही या सर्व प्रमुख नेत्यांना अहमदाबादला निमंत्रित करून एकीचे दर्शन घडवले होते. आता निवडणुकीनंतर आभार कार्यक्रम व बैठकीसाठी शहांनी स्वत: उद्धव ठाकरे यांना आठ वेळा फोन करून उपस्थित राहण्याचा आग्रह केल्याने उद्धव तातडीने दिल्लीला रवाना झाले.

आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी
मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने उपस्थित राहण्याचा आदेश दिला. मात्र स्वत: उद्धव यांनीच बैठकीला यावे यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर तब्बल आठ वेळा फोन केल्याची माहिती आहे. 

ठाकरे कुटुंबीय परदेशातून आजच सकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ते सर्वजण आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या लग्नासाठी ठाणे येथे गेले होते. मात्र, आज सायंकाळी दिल्लीत ‘एनडीए’च्या घटक पक्षांची बैठक बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांनी घटक पक्षांच्या सर्व अध्यक्षांनी बैठकीला व्यक्तिश: हजर राहावे, अशी विनंती केली होती. पण उद्धव यांनी सुभाष देसाई यांना जाण्यास सांगितले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी तातडीने उद्धव ठाकरे यांना संपर्क साधत व्यक्तिश: हजर राहण्याची विनंती केली. यानंतर लग्नाचा कार्यक्रम आटोपून उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल झाले आणि लगेच खासगी विमानाने ते ६.३० च्या सुमारास दिल्लीकडे रवाना झाले.

या वेळी त्यांच्यासोबत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah Call to Uddhav Thackeray Politics