'कलम 370'वरून अमित शहांकडून पुन्हा शरद पवार लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

काँग्रेस आणि राष्ट्रवादी कौंटुंबिक पक्ष आहेत. त्यामुळे नागरिकांनी ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादाच्या मागे जायचे की कौंटुंबिक पक्षांच्या. राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनीही इंदिरा गांधी यांचे कौतुक केले होते. कारण, तेव्हा देशाचा प्रश्न होता. देशाच्या मुद्द्यावर राजकारणाची गरज नाही.

मुंबई : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध का होता. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे ते कलम 370 हटविण्याचे समर्थन करतात की नाही. हा भारतमातेचा मुद्दा आहे, राजकारणाचा नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी करत पवारांना पुन्हा लक्ष्य केले.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्याप्रकरणी अमित शहा यांचे मुंबईत व्याख्यान आहे. गोरेगावमधील नेस्लो संकुलात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत अमित शहा यांनी सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.

अमित शहा म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी कौंटुंबिक पक्ष आहेत. त्यामुळे नागरिकांनी ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादाच्या मागे जायचे की कौंटुंबिक पक्षांच्या. राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनीही इंदिरा गांधी यांचे कौतुक केले होते. कारण, तेव्हा देशाचा प्रश्न होता. देशाच्या मुद्द्यावर राजकारणाची गरज नाही. काश्मीर भाजपसाठी राजकीय मुद्दा नाही. देशहितासोबत कोण आहे आणि विरोधात कोण आहे, हे आता जनतेने ठरवावे. कुटुंबालाच प्राधान्य देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जनतेने जाऊ नये. महाराष्ट्र छत्रपतींची भूमी आहे. त्यामुळे त्यांनी कलम 370 ला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. भारतमातेला अखंड बनवण्याचा तुम्हाला राजकारण दिसते मला देशभक्ती दिसते. जेव्हा देशहिताचा विषय असतो तेव्हा आम्ही मागे हटत नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताचा सन्मान वाढला. पण, काँग्रेसने त्याचा पुरावा मागितला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah once again targets Sharad Pawar on article 370