महिन्याभरात पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना दोनदा पत्र, पत्रास कारण की...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

कोरोना महासाथीत जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या आरोग्य सेवकांच्याच मानधनात कपात होणं योग्य नाही.- अमित ठाकरे 

मुंबई- महाराष्ट्राच कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची आकडेवारी पाहता मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ही जास्त आहे. सध्या राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन आणि कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. अमित ठाकरे यांनी महिन्याभरात दोन वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. 

या पत्रात अमित ठाकरे यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या पगारात कपात होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी केली आहे. याआधीही अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनावर काही उपाय सुचवले होते. 

मोठी घोषणा, 1 जूनपासून धावणार नॉन AC ट्रेन्स, तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या...

कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात ‘डॉक्टर हेच देव’ ठरत असताना त्यांच्या मानधनात सरकारने कपात करणं, हे कोणत्याही दृष्टीने न पटणारं आहे, असं अमित ठाकरे ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मनसेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे पत्र ट्विट केलं आहे. 

  

डॉक्टरांच्या मानधनातील कपात अन्यायकारक

अमित ठाकरे पुढे पत्रात म्हणतात की, महाराष्ट्र सरकारच्या 20 एप्रिल 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन 55 हजार ते 60 हजार रुपये इतकं आहे. याशिवाय अधिकाऱ्यांना सेवार्थ प्रणाली अंतर्गत मिळणारे मासिक वेतन आणि भत्ते मिळून 78 हजार रुपये इतकं मानधन मिळते. मात्र, नव्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांचे मानधन कंत्राटी सेवा अंतर्गत निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात 20 हजार रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. या तरुण डॉक्टरांच्या मानधनातील कपात अन्यायकारक आहे.

वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका यांना त्यांचे पूर्वीचेच वेतन देण्याबाबत आपण त्वरित योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधनाला कोणताही अर्थ उरणार नाही, असंही अमित ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

मुंबई मेट्रोनं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय..लॉकडाऊन संपल्यानंतर होणार महत्वाचा बदल.. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली आहे. त्यांचं 35 हजार रुपये इतकं मानधन आहे. मात्र, शासनाच्या नव्या आदेशानुसार त्यांना फक्त 25 हजार रुपये वेतन मिळत असल्याचं म्हणत डॉक्टरांच्या पगारात किंचितही कपात होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री काका यांच्याकडे केली आहे. 

यापूर्वीच्या पत्रात काय म्हटलं होतं 

यापूर्वी पाठवलेल्या पत्रात अमित ठाकरे यांनी आपल्या काकांना कोरोनावर काही उपाय सुचवले होते. अमित ठाकरेंनी या पत्रात राज्य सरकारकडून अनेक चांगले प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील नमूद सुद्धा केलं होतं. कोरोना रुग्णांच्या अडचणी पत्रात मांडण्यात आल्या होत्या. राज्यात कोरोना व्हायरस आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालयं कार्यरत आहे. त्या रुग्णालयांमध्ये बे़ड्सची क्षमता किती आहे याची स्पष्टपणे माहिती नागरिकांना नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगून नागरिकांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात असल्याचं समोर आलं आहे. ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात असल्यानं रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे यावर उपाय योजना कराव्यात असं पत्रात म्हटलं होतं.

Amit Thackeray writes one more letter to cm and uncle uddhav thackeray about health workers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Thackeray writes one more letter to cm and uncle uddhav thackeray about health workers