Uddhav-Thackeray-sad-face
Uddhav-Thackeray-sad-face

'पहचान कौन?'; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई: गेल्या एक-दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण खूपच तणावपूर्ण आहे. सर्वप्रथम उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली. पाठोपाठ त्या कारचा मालक मनसुख हिरेनची हत्या झाली. ते प्रकरण ताजं असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला. त्यात अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तशातच सचिन वाझेने एका पत्रातून शिवसेनेच्या अनिल परबांवर खंडणी मागितल्याचे आरोप केले. हे सारं सुरू असतानाच दुसरीकडे कोरोनाची वाढती संख्या आणि अपुरा लससाठी हेदेखील प्रश्न राज्यापुढे आ वासून उभे आहेत. पण या साऱ्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसं काही बोलताना दिसत नाहीत. त्यांच्या या मौनावर प्रचंड टीका केली जात असून आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

अमृता फडणवीस या राजकीय बाबींवर ठराविक अंतराने आपली सडेतोड मतं व्यक्त करत असतात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात त्यांनी आपली मत याआधीही ठामपणे मांडली आहेत. सध्या एका नव्या ट्वीटमुळे त्या चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांनी एक कोडं विचारत त्यातून उद्धव ठाकरेंना ट्रोल केलंय. "ओळखा पाहू कोण? ... एक राजा जो महालाचा उंबरठाही ओलांडत नाही, जनतेला कधीही भेटत नाही, सत्य आणि कर्माच्या रस्त्यावर चालत नाही, वसुलीशिवाय त्याचं पान हालत नाही, महामारीचा कहर त्याच्याकडून सांभाळला जात नाही, प्रगतीचं फुल त्याच्या सावलीत उमलत नाही...", असं ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. तसेच, "धोका दिल्याने कधीही चांगला निकाल मिळत नाही हे खरं आहे. त्यामुळे अशा राजाला पाहून तुमचं रक्त खळवत नाही का?" असा सवाल त्यांनी जनतेला केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणं अद्याप टाळलं आहे. मात्र कोरोना संदर्भात त्यांची काल पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडीओद्वारे चर्चा झाली. त्या चर्चेत ठाकरे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे. तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल, अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com