चैत्यभूमीसमोर भीमज्योत हा राजकीय डाव : आनंदराज आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

सरकारच्या माध्यमातून दादर चैत्यभूमी येथे अखंड भीमज्योत उभारली जात आहे. अशी ज्योत उभारण्याचा प्रकार म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय डाव.

मुंबई : सरकारच्या माध्यमातून दादर चैत्यभूमी येथे अखंड भीमज्योत उभारली जात आहे. अशी ज्योत उभारण्याचा प्रकार म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय डाव आहे, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. हे स्मारक भव्यदिव्य व्हावे म्हणून इंदू मिलची जागा सरकाराने ताब्यात घेतली होती. इंदू मिलच्या जागेवर 2019 पूर्वी डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाईल, असे सरकारमार्फत सांगण्यात आले होते. इंदू मिलच्या जागेवर स्मारकाचा पायासुद्धा रचण्यात सरकारला अपयश आले आहे, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. 

चैत्यभूमी येथे 6 डिसेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. चैत्यभूमीचे दर्शन घेण्यासाठी 12 - 12 तास रांगेत उभे राहतात. मात्र, चैत्यभूमीजवळ असलेल्या अशोक स्तंभाजवळ भीम ज्योत उभारून जे लोक 12 तसा रांगेत उभे दर्शन घेतात. त्या लोकांनी भीमज्योतीचे दर्शन घेऊन चैत्यभूमीत जाऊ नये, असा डाव आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून आखण्यात आला आहे.

अशी भीमज्योत उभारून चैत्यभूमीचे महत्व कमी करण्याचा डाव आखला गेल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. या राजकीय डावाला आंबेडकरी जनता फसणार नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anandraj Ambedkar Criticizes Government on various Issue