म्हणून साई कोंड गावात पर्यटकांची गर्दी 

अजित शेडगे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

साई कोंड गावाच्या परिसरात अनेक वेळा प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. त्यामुळे या भागात समृद्ध संस्कृती नांदत असावी, असा अंदाज आहे.

 माणगाव : शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम करताना प्राचीन मूर्ती आणि शिलालेख सापडेलेल्या साई कोंड गावाकडे शेकडो पर्यटक, अभ्यासकांची पावले वळू लागली आहेत. ग्रामस्थांनीही हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

साई कोंड गावाच्या परिसरात अनेक वेळा प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. त्यामुळे या भागात समृद्ध संस्कृती नांदत असावी, असा अंदाज आहे. याच भागातील चांदोरे परिसरात उत्खनन करताना ऐतिहासिक नाणी आणि अन्य साधने सापडली होती. हे ठिकाण समुद्र मार्गाच्या जवळ आहे. तसेच ते मोक्‍याचे ठिकाण आहे. व्यापारासाठीही ते प्रसिद्ध होते. 

धक्कादायक : भक्ष्यांचा पाठलाग करताना तो पडला आणि...

साई कोंडमध्ये मंदिराचे प्राचीन भाग, मूर्ती, विरगळ, सतीशिळा, द्वारशाखा, भग्न खांब, उंबरे, नंदी, गणेशमूर्ती आदी अमूल्य ठेवा सापडला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये कुतूहल आहे. इतिहासप्रेमी, अभ्यासक, शिक्षक या ठिकाणाला आवर्जून भेट देत आहेत.

हे वाचा : विखे पाटील भाजपची साथ सोडणार?

साई कोंड येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम सुरू होते. त्या वेळी मूर्ती सापडल्या आहेत. प्राचीन अवशेषही सापडले. त्यामुळे या भागातील संपन्न व समृद्ध वारसा असल्याचे पुरावे मिळत आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी याच ठिकाणी वस्तुसंग्रहालय उभारण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. यासाठी सरकारकडून निधी मिळावा आणि पुरातत्त्व विभागाचा ‘ब’ दर्जा गावाला मिळावा.
- गजानन अधिकारी, अध्यक्ष, जीर्णोद्धार समिती

कोकणाच्या इतिहासातील महत्त्वाचा कालखंड असलेल्या सातवाहन राजसत्तेच्या काळातील व्यापारी मार्गावरील साई कोंड हे गाव आहे. शिवमंदिराचे अवशेष विशेषतः गजांत लक्ष्मीचे शिल्प सापडले आहेत. यावरून तत्कालीन आर्थिकदृष्ट्या संपन्नतेच्या खाणाखुणा दिसून येतात. शिलाहार, यादव अशा वेगवेगळ्या कालखंडातील वीरगळ गावाच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. हा ठेवा या भागाचा इतिसाह उलगडणार आहे. 
- रामजी कदम, 
इतिहास अभ्यासक

शिलाहार काळातील राजवटीतील साधारणपणे ११ व्या ते १२ व्या शतकातील हे अवशेष असावेत. श्रीवर्धन या मार्गावरील हे प्राचीन ठिकाण आहे. पूर्वमध्ययुगीन काळातील हा व्यापारी मार्ग होता. मंदराजांच्या काळातील ही महत्त्वाची ठिकाणे होती. यामध्ये चांदोरे, तळेगांव, चरई, साई कोंड ही गावे या मार्गावर असल्याने या ठिकाणचा इतिहास हा प्राचीन आहे. संग्रहालय करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.
- डॉ. अंजेय धनावडे, इतिहास अभ्यासक, संशोधक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ancient idols have been found several times in the Sai Kond village.