
Andheri Gokhale Bridge Traffic Issue
पश्चिम उपनगरातील लाखो नागरिकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाला आणि अंधेरीसह वांद्रे ते दहिसर परिसरात गेल्या १५ दिवसांपासून भयावह वाहतूक कोंडी होत आहे. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी आता दीड ते अडीच तास खर्ची घालावे लागत आहेत. गोखले पुलाला पर्यायी असलेले मार्ग दुबळे असल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागत आहे. २०१८ मध्ये गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला. त्यावेळी सदर पूल धोकादायक असल्याचे समोर आल्यानंतरही गेली चार वर्षे प्रशासनाने केवळ वेळ काढण्याचे काम केले. आताही पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षांचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंत वेळ, इंधन, पैशाच्या चुराड्यासह नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे प्रशासन एकप्रकारे गुन्हेगारच ठरत आहेत.
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वपूर्ण गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर अंधेरीसह वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या परिसरातील अनेक मार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. एरवी १५ ते २० मिनिटे लागणाऱ्या अंतरासाठी आता मुंबईकरांना दीड ते दोन तासांचा वेळ खर्ची घालावा लागत आहे. गोखले पूल बंद केल्याने केवळ वाहतूक कोंडीच होत नसून त्यामुळे प्रवासाचा वाढलेला अतिरिक्त वेळ, इंधनावरील खर्च, आरोग्यविषयक समस्या, मानसिक तणावापासून ते नातेसंबंधांवरही परिणाम होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाहतूक कोंडीत अडकण्याचा परिणाम हा कामावर जाणाऱ्या वर्गासोबतच ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांवरही होत आहे. शाळेत वेळेवर पोहोचण्याठी विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा दीड-दोन तास आधी निघावे लागत आहे. काही विद्यार्थ्यांनी तर ही कोंडी टाळण्यासाठी पायी जाणे पसंत केले आहे.
गोखले पुलामुळे वाहतूक व्यवस्थेचा एकीकडे बोजवारा उडालेला असतानाच, वाहतूक पोलिसांची तोकडी यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यास कमी पडत आहे. त्यातच नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे. गोखले पुलाच्या कामामुळे पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत; मार्ग हे सर्व मार्ग हे वाहनचालकांसाठी द्राविडी प्राणायाम करण्यासारखेच आहे. अंधेरी सबवे, मिलन सबवे, खार सबवे हे ‘बॉटलनेक’ असल्याने वाहनचालकांसह पोलिसांचीही त्रेधातिरपीट उडत आहे.
यंत्रणांची टोलवाटोलवी
गोखले पुलाच्या पादचारी भाग ३ जुलै २०१८ रोजी पडल्यानंतर महापालिकेने पुलाच्या कामासंदर्भात निविदा काढली. पालिकेने रेल्वेच्या अखत्यारीतील कामासाठी पाठपुरावा करत पत्र २०१८ मध्ये दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रेल्वेने पालिकेच्या अहवालानंतर २०२२ मध्ये या कामासाठी पुढाकार घेतला. दरम्यानच्या काळात चार वर्षांत काहीही झाले नाही, हा कालावधी अक्षरशः वाया गेला. या काळात आयआयटीच्या सल्ल्यानुसार पुलाला तात्पुरता आधार देण्यात आला, तर दुसरीकडे पालिकेने रेल्वेच्या हद्दीतील ९० मीटरचा भाग वगळून आपल्या अखत्यारीतील २६८ मीटरच्या कामाला सुरुवात केली. पालिकेच्या नियोजनानुसार रेल्वेचा भाग हा कमी उंची राहणार असल्याने एसी-डीसी कनव्हर्जनसाठी अडचणीचा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे रेल्वेने या प्रकरणात उशिरा का होईना लक्ष घालायला सुरुवात केली. सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार रेल्वेने या कामाची जबाबदारी पालिकेने घ्यावी, असे सुचवले. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रेल्वेच्या भागातील हिस्सा हा रेल्वेनेच पाडावा, यावर शिक्कामोर्तब झाले. त्यासाठी पालिकेने रेल्वेला आतापर्यंत १८ कोटी रुपयेही दिले; मात्र मागील चार वर्षांमध्ये पालिकेने रेल्वेकडे न केलेला पाठपुरावा आणि रेल्वेच्या यंत्रणेत ९० मीटरच्या भागासाठी निर्णय घेण्यासाठी झालेली दिरंगाई, यासाठी मुंबई महापालिका आणि रेल्वे या दोन्ही यंत्रणा या दिरंगाईला जबाबदार आहेत.
मेट्रोच्या प्रवासीसंख्येत वाढ
गोखले पुलाअभावी अंधेरी पूर्व-पश्चिम प्रवास करण्यासाठी अनेकांनी आता मेट्रोचा पर्याय स्वीकारला आहे. त्यात शाळकरी मुलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्येत अल्पावधीतच सुमारे ४० हजारांनी वाढ झाली आहे. गोखले पूल बंद होण्यापूर्वी मेट्रो-१ मार्गाची दररोज प्रवासीसंख्या तीन लाख ४० हजार होती. ही संख्या पूल बंद झाल्यावर तीन लाख ८० हजारावर गेली आहे.
- प्रवक्ता, मुंबई मेट्रो १
आरोग्यावर विपरीत परिणाम
कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागल्याने अनेकांना लघवीचा त्रास होतो. बराच वेळ लघवी साठवून ठेवल्यास लघवीची पिशवी, मूत्रनलिकेसह किडनीवरही विपरीत परिणाम होतो. तसेच मूतखड्याचाही त्रास वाढतो. तसेच मुंबईतील दमट वातावरणामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बळावण्याचा धोका असतो.
- डॉ. राजश्री कटके-सोनावणे, स्त्रीरोगतज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय
कधी-कधी खूप चिडचिड होते!
मी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतो. अनेक क्लायंट्सना भेटण्यासाठी मला अंधेरी पश्चिम ते मरोळ प्रवास करावा लागतो. गोखले पूल सुरू असताना मला ३० ते ३५ मिनिटे लागायची; परंतु आता हाच वेळ सव्वा तासावर गेला आहे. संध्याकाळी घरी परतताना अनेकदा वाहतूक कोंडीत अडकल्याने चिडचिड वाढते. प्रवासाच्या वाढत्या वेळेसोबतच इंधनासाठीही अधिक पैसे मोजावे लागतात. अनेकदा लोकांनी शिस्त न पाळल्याने कोंडी होते. अशा वेळी वाहतूक पोलिस येत नाहीत, तोवर त्यातून मार्ग निघत नाही. सध्या पोलिसांकडून सुरू असलेले प्रयत्न चांगले आहेत, पण ते तोकडे आहे.
- मधु गटानी, रिअल इस्टेट व्यावसायिक
मी मेट्रोचा पर्याय स्वीकारला!
आमची मरोळला प्रिटिंग प्रेस आहे. या ठिकाणी मी आणि माझे वडील दोघेही काम करतो. एरव्ही ४० मिनिटांचा प्रवास हा गोखले पूल बंद झाल्याने आता दुप्पट म्हणजे दीड ते दोन तास झालेला आहे. त्यामुळे मी वर्सोव्याच्या राहत्या घरापासून मेट्रोचा पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे माझा प्रवास अर्ध्या तासात होतो; परंतु माझे वडील मिलिंद शहा यांना हाच प्रवास करण्यास कधी दीड तास; तर कधी सव्वादोन तास लागतात. एक तासाचा प्रवास वाढल्याने सरासरी २ लिटरचा इतका इंधनाचा अतिरिक्त वापर या कालावधीत होतो. गाडी वाहतूक कोंडीत अडकली, तरीही गाडीला इंधन लागतेच. वडिलांचे वय ७२ वर्षे असल्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांना जेवणाचा डबा आणि बॅग घेऊन प्रवास करणे शक्य नाही.
- मिलिंद शहा, व्यावसायिक
वाहतूक पोलिसांची दमछाक
गोखले पूल बंद असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी सहार, वाकोला, सांताक्रूझ, डी. एन. नगर यांसारख्या ठिकाणांहून वाहतूक पोलिसांकडून ६० अधिकारी आणि ३० वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांची अतिरिक्त कुमक नेमूनही वाहतूक कोंडीची नवनवे ठिकाणे दररोज समोर येत आहेत. नागरिकांच्या सूचनेनुसार पोलिसांना दररोज नियोजनात बदल करावे लागत आहेत. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे. परिणामी दररोज सकाळ-संध्याकाळ अंधेरी परिसरात भीषण कोंडी होत आहे. दुसरीकडे शाळांच्या वेळातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थीही या वाहतूक कोंडीचा बळी ठरत आहेत.
पर्यायी मार्ग
कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल
मिलन सबवे
ठाकरे उड्डाणपूल
अंधेरी सबवे
खार सबवे
ना. सी. फडके मार्गावरील नवा पूल धूळ खात
अंधेरी जंक्शन भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने ना. सी. फडके मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर २०१९ पासून उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. हा पूल १२५ मीटर लांब असून त्यासाठी ५२५ कोटी रुपये खर्च आला आहे. तीन वर्षांनंतर ऑगस्टअखेरीस हा पूल खुला करण्यात येणार होता; मात्र अद्याप तो धूळखात पडला आहे.
1 कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर तीन ते चार रस्ते जोडले आहेत. येथील वाहने मुख्य मार्गावर येत असल्याने कोंडी होते.
2 एलबीएस मार्गावर असलेल्या सिग्नलजवळ वाहने थांबत असल्याने चारही बाजूंनी कोंडी होते. वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे सर्व मार्ग ठप्प होतात.
3 वाहतूक कोंडीत केवळ चारचाकी किंवा बस, अवजड वाहने अडकतात. गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केला असला तरी दुचाकी वाहने बेकायदा या पुलावरून प्रवास करतात.
हे आहेत कोंडीचे मार्ग
अंधेरीहून गोरे उड्डाणपूल एलबीएस मार्ग
इर्ला भागातील राम गणेश गडकरी मार्ग
एलबीएस मार्गासह परिसरातही मोठी कोंडी
अंधेरी सबवेजवळही मोठ्या प्रमाणात कोंडी
गोखले पुलासाठी खर्च किती?
१२५ मीटर लांब
५२५ कोटी रुपये खर्च
गोखले पुलाची टाईमलाईन
१९७४ - १९७५
या काळात गोखले पुलाचे बांधकाम झाली
जुलै २०१८
पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने दोघांचा मृत्यू; तीन जण जखमी आणि पूल धोकादायक असल्याचाअहवाल
एप्रिल २०१९
आयआयटीच्या सल्ल्यानुसार पुलाला तात्पुरता आधार
मार्च २०२०
पालिकेकडून पुलाचे काम सुरू होणे अपेक्षित
नोव्हेंबर २०२२
गोखले पूल बंद करण्याचे जाहीर
पायाभूत सुविधांत हवा स्वच्छतागृहांचा विचार
शहरी भागात वाहतूक कोंडी झाल्यास महिला आणि पुरुषांना लघवीला जाण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. त्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधा उभारतानाच त्याबाबत विचार होणे गरजेचे आहे; परंतु विकास प्रक्रियेत त्याचा विचार होतो का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. महिलांना एखाद्या ठिकाणी गाडी पार्क करून लघवीला जाण्याची व्यवस्था उभारली जाईल का, हा प्रश्नच आहे.
- सुप्रिया जाण, कार्यकर्त्या, कोरो राईट टू पी मूव्हमेंट
पाणी प्यायचे बंद करावे लागते!
मी ट्रॅव्हल मॅनेजर असून जे. बी. नगर येथील एका कार्यालयात काम करते. गोखले पूल बंद झाल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता लवकर निघण्याशिवाय पर्याय नाही. वाहतूक कोंडीत अडकणार असल्याने मी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच पाणी प्यायचे बंद करते. या कालावधीत लघवीला येणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.
- श्वेता चोइथरमानी, ट्रॅव्हल मॅनेजर
मानसिकतेवर परिणाम
समाजात घडणाऱ्या विविध घटनांचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. सध्या गोखले पूल बंद असल्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवणे फार गरजेचे आहे. वाहतूक कोंडी आणि मानसिक स्वास्थ्याचा फार जवळचा संबंध आहे. कोंडीत अडकल्याने अनेकांची दिवसभर चिडचिड होते व त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. वाहतूक कोंडीत अडकल्यावर राग येणे, हे स्वाभाविक आहे; परंतु या रागावर नियंत्रण आणणे ही आपली जबाबदारी आहे.
- डॉ प्रतीक सुरंदशे, मनोविकारतज्ज्ञ
१८ कोटी रेल्वेला अदा
1 अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलाचा ९० मीटरचा भाग तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेकडे १८ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने या रकमेचा भरणा केल्याची माहिती मिळाली आहे.
2 मुंबई महानगरपालिकेने ८८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पालिकेच्या अखत्यारीतील जागेसाठी सुरू केली आहे; तर रेल्वे प्रशासनानेही आपल्या भागातील कामासाठी निविदा काढली.
जानेवारीत तोडकाम
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत रेल्वे आणि पालिका यांना समांतर पद्धतीने काम करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार रेल्वेकडून ९० मीटरचे बांधकाम जानेवारीपासून रात्रीच्या वेळेत ब्लॉक घेऊन हटवण्यात येणार आहे. रेल्वेवर हा पूल तोडून घेण्याची जबाबदारी असणार आहे; तर पालिकेकडे या ठिकाणी नव्याने गर्डर तयार करून तो बसवण्याची जबाबदारी असेल.
आराखड्याला हिरवा कंदील
आयआयटी मुंबईने दिलेल्या पुलाच्या आराखड्याला काही दिवसांपूर्वीच रेल्वे आणि पालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे. पालिकेच्या विनंतीवरून पुलाचा आराखडा तातडीने मंजूर करण्याच्या सूचनेवर आयआयटीने तात्काळ प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या आराखड्याच्या आधारावरच पालिकेकडून कामाला सुरुवात होईल.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील पुलाचा भाग वगळता रेल्वेच्या हद्दीतील भाग वाहतुकीसाठी सुरक्षित होता. या भागाचे सक्षमीकरणही करण्यात आले होते. त्यामुळे पालिकेच्या भागातील कामाव्यतिरिक्त रेल्वेचे काम सुरक्षित होते. पालिकेने २०२१ मध्ये झालेल्या बैठकीत हा पूल पाडून उभा करण्याची जबाबदारी घेतली होती; परंतु नुकत्याच झालेल्या बैठकीत ही जबाबदारीही रेल्वेकडे आली आहे. आयआयटी मुंबईकडून आराखड्यासाठी परवानगी न घेतल्यानेच तो मंजुरीसाठी गेला होता. म्हणूनच यासाठीची परवानगी घेण्याची मागणी रेल्वेने पालिकेकडे केली होती.
- नीरज वर्मा, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात केली होती. त्याच वेळी पश्चिम रेल्वेकडेही या कामाबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. कामाबाबत रेल्वे यंत्रणेशी पाठपुरावाही करण्यात आला आहे. पालिकेकडे पूल तोडण्यासाठी स्वतःची अशी विशेष यंत्रणा नाही. पालिकेचा या कामातील नसणारा अनुभव यामुळेच रेल्वेने त्यांच्या अखत्यारीतील भाग तोडून द्यावा, अशी विनंती पालिकेने केली होती.
- उल्हास महाले, उपायुक्त, पायाभूत सुविधा, मुंबई महापालिका
(संकलन - किरण कारंडे, तेजस वाघमारे, भाग्यश्री भुवड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.