म्हसळ्यात माकडांचा हैदोस

म्हसळा : शहरात माकडांनी हैदोस मांडला असून बागशेतीचे प्रचंड नुकसान करत आहेत.
म्हसळा : शहरात माकडांनी हैदोस मांडला असून बागशेतीचे प्रचंड नुकसान करत आहेत.

म्हसळा (बातमीदार) : समृद्ध वनसंपदा लाभलेल्या म्हसळा तालुक्‍यात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. १०-१२ वर्षांपासून रानडुकरे, रानगवा, नीलगाय, माकड, वानर व केलट्यांनी तालुक्‍यातील रानात, शेतीत धुमाकूळ घालत असताना सध्या माकडांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. बागायतीची हानी तसेच शहरातील घरांचेही नुकसान करत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साधारणपणे माकड, वानर, केलट या जाती पूर्वी सर्रास जंगलात आढळत असत; परंतु काही वर्षांपासून म्हसळा शहरामध्ये माकडांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे माकडांची तक्रार वन विभागाकडे का नगर पंचायतीकडे करायची? ही समस्या महिलांसमोर आहे. शहरातील कन्या शाळा, विद्यानगरी, तांबट आळी, एकता नगर, ब्राह्मण आळी, वाऱ्याचा कोंड, जैन कॉलनी, कुंभार वाडा, गोळवाडी, नवानगर या परिसरात परसबागेतीत फळ व फुले झाडे, वाळत टाकलेल्या वस्तू, ब्लॉकचे स्लायडिंग उघडून विविध जिन्नस पळवणे, बाजारपेठ परिसरांत धुमाकूळ घालत असतात. काही किराणा व्यापाऱ्यांचे गोडाऊन या माकडांनी लक्ष्य केले आहे.

माकडे जंगल सोडून मानव वस्तीकडे का येतात, याचाही विचार होण्याची गरज आहे. जंगलांना लागणारे वणवे आणि वृक्षतोड ही कारणे याला कारणीभूत आहेत. पूर्वी जंगलांमध्ये आंबा, जांभूळ, कोकम, बांबू, हसन, वटवृक्ष अशी पशुपक्ष्यांचे खाद्य असलेली झाडे मुबलक प्रमाणात असत; मात्र वृक्षतोडीत ही झाडे राहिली नाहीत. वनखाते जंगलात जी वृक्षलागवड करते, ती आकेशिया, बाभूळ, नीलगिरी यांसारखी जलद वाढणारी झाडे असतात. मात्र, ही झाडे तृणभक्षक प्राण्यांसाठी उपयोगाची नाहीत. त्यामुळे वन्य प्राणी आता मानवी वस्तीकडे वळले आहेत. हे विस्कळित अन्नसाखळीचे सारे दुष्परिणाम आहेत.

आता तर माकडे बागशेतीमध्‍ये घुसून फळांचे नुकसान करत आहेत. ग्रामीण भागातील काही कौलारू घरांचे तर प्रचंड नुकसान माकडांनी केले आहे. यामुळे नागरिकांचे अार्थिक नुकसान होत आहे.

वनखात्याने आता माकड उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे. एकतर माकड पकड मोहीम राबवा किंवा माकडांना पुन्हा जंगलात परतवण्यासाठी काहीतरी उपाय आखा, अशी मागणी शेतकरी बागायतदारांकडून होऊ लागली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कौलारू घरांची संख्या अधिक आहे. मात्र माकडे उड्या मारून घरांची कौले, कोने मोठ्या प्रमाणावर फोडू लागले आहेत. हे नुकसान सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे हत्तींप्रमाणेच माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी वनखात्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- वैशाली सावंत, माजी जिल्‍हा परिषद सदस्य, म्हसळा

रानडुकरे, रानगवा, नीलगाय, माकड, वानर व केलटानी रानात शेती, फळबागांना नुकसान झाल्यास सरकारकडून नुकसान भरपाई मिळते. योग्य अवधीत वन विभागाकडे तक्रार केल्यास ही भरपाई मिळते.
- नीलेश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी म्हसळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com