नेस्को कोविड केंद्रात आणखी 224 बेड्स; डायलिसीसची ही सुविधा,आज होणार उद्घाटन  

भाग्यश्री भुवड
Friday, 11 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरेगावच्या नेस्कोमध्ये आजपासून 224 खाटांची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागापासून ते सिटीस्कॅनपर्यंतच्या सर्व अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात आहेत.

मुंबई:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरेगावच्या नेस्कोमध्ये आजपासून 224 खाटांची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागापासून ते सिटीस्कॅनपर्यंतच्या सर्व अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने अवघ्या 45 दिवसांत हे रूग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात आयसीयू यूनिट, डायलिसीस सेंटर, सिटीस्कॅन, नियंत्रण कक्ष, ऑक्सिजन पुरवठा करणारे यूनिट तसेच हवा शुद्धीकरण केंद्र आहे. नेस्कोमध्ये आधीपासून 500 खाटांचे जम्बो कोरोना सेंटर असून त्यात आता अधिक 224 खाटांची भर पडणार आहे. 

लवकरच हे रूग्णालय लोकांच्या सेवेत समर्पित होईल. या ठिकाणी आलेला रुग्ण हा ठणठणीत बरा होऊनच गेल पाहिजे. यासाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून रुग्णांवर 24 तास लक्ष देणे सोयीचे होणार असल्याची माहिती नेस्कोच्या कोविड समर्पित रुग्णालयाच्या डॉ. नीलम अंन्द्राडे यांनी दिली आहे. त्यात, या आयसीयूमध्ये डायलिसीस बेडसची विशेष सुविधा दिली जाणार असुन त्यासाठी 10 बेड्स असणार आहेत. 

आज या कोविड केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. यात 224 आयसीयू बेड्स आणि 10 डायलिसीसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेकदा कोविड रुग्ण गंभीर परिस्थितीत केंद्रात दाखल होतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आयसीयूची गरज भासते. कोविड केंद्रात आयसीयूची सुविधा नसल्याने त्यांना कोविड रुग्णालयात पाठवले जाते. पण, आता कोविड रुग्णांना आयसीयूसाठी कुठे ही जावे लागणार नाही. कारण केंद्रातच आयसीयू बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सोबतच, ज्या रुग्णांना डायलिसीसची गरज भासते जसे की किडनीचे आजार असलेले रुग्ण किंवा ज्यांचे क्रियाटीन वाढून ज्यांना डायलिसीसची आवश्यकता असते अशा रुग्णांसाठी 10 बेड्स डायलिसीससाठी दिले जाणार आहेत अशी माहिती नेस्को कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंन्द्राडे यांनी दिली आहे.

---------

(संपादनः पूजा विचारे) 

Another 224 beds Nesco Covid Center facility dialysis inaugurated today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 224 beds Nesco Covid Center facility dialysis inaugurated today