महाड इमारत दुर्घटना प्रकरणी आणखी एकाला अटक; इमारत बांधकाम आणि व्यवहाराशी होता संबंध

सुनिल पाटकर
Saturday, 29 August 2020

महाड शहरातील काजळपूरा येथील तारीक गार्डन  दुर्घटनेला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली  युनुस शेखला अटक करण्यात आली असुन त्याला  14 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे.

महाड  - महाड शहरातील काजळपूरा येथील तारीक गार्डन  दुर्घटनेला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली  युनुस शेखला अटक करण्यात आली असुन त्याला  14 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे. शहरातील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यवसायिक युनुस अब्दुल रज्जाक शेख (रा. खारकांड मोहल्ला) याला शहर पोलिसांनी आज सकाळी दहा वाजता त्याच्या घरातून अटक केली . आता या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून यापैकी दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

वसईत पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वादात 'जनता गेली खड्डयांत';  रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक हैराण

 या दुर्घटनेप्रकरणी या इमारतींचा बिल्डर फारूक महामुदमिया काझी ( रा तळोजा ) याच्यासह  आर सी सी कंन्सलटंट बाहूबली धामणे, आर्कीटेक्ट गौरव शहा (नवी मुंबई) , नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिपक झिंजाड व बांधकाम पर्यवेक्षक शशिकांत दिधे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता . यापैकी आर सी सी कंन्सलटंट बाहुबली धामणे याना अटक केली होती , त्यानंतर पोलीस तपासात युनुस शेख याचाही या इमारत बांधकाम व व्यवहारांशी संबंध असल्याच्या या इमारतीच्या रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर युनुस शेख यालाही पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांनी आज सकाळी अटक केली . युनुस शेखला आज दुपारी न्यायालयात हजर केली असता त्याला 14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी महाड दिवाणी न्यायालयाने सुनावली आहे.

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

याप्रकरणी मुख्य आरोपी बिल्डर फारूक काझी याच्यासह अन्य चार आरोपी फरारी असून शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत . केवळ निकृष्ट बांधकामामुळेच ही इमारत कोसळली असल्याचे स्पष्ट होत असून यामधील आरोपींची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे . या इमारतीतील रहिवासी असलेले 45 कुटुंबे ही इमारत कोसळल्यामुळे बेघर झाली असून या सर्वांचे संसार अक्षरश: उघड्यावर पडलेले आहेत .

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another arrested in Mahad building accident case; The building was concerned with construction and dealing