अन्वय आत्महत्या प्रकरण: तपास CBIमार्फत करा,अर्णब गोस्वामींची मागणी 

अन्वय आत्महत्या प्रकरण: तपास CBIमार्फत करा,अर्णब गोस्वामींची मागणी 

मुंबईः इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले गोस्वामी यांनी गुरुवारी न्यायालयात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले. यामध्ये या प्रकरणाचा तपास अलिबाग पोलिसांऐवजी सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. तसेच पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यापासून मनाई करावी आणि संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा दुसरा अर्ज केला आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी ए समरी अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चौकशी होऊ शकत नाही. तसेच फेरतपास करण्याचा अधिकार सरकारला नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले फेरतपासाचे आदेश रद्द करावे, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेला प्रकरण सोपवावे, अशी मागणी केली आहे. 

या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले नाही. त्यामुळे सरकारने कोणत्याही परवानगीशिवाय हा तपास सुरू केला आहे, असे अर्जात म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हा तपास काढून सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी गोस्वामी यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांच्या जामीन निकालात व्यक्त केलेल्या निरीक्षणांचा दाखलाही यामध्ये देण्यात आला आहे.

५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.  अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी गोस्वामी यांच्यासह या दोघांचा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा उल्लेख केला आहे. नाईक यांच्या मुलीने याप्रकरणी फेरतपासाची मागणी केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. यामध्ये अलिबाग पोलिसांनी गोस्वामी यांना अटकही केली होती.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Anvay Naik case Investigate through CBI demands Arnab Goswami

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com