एपीएमसीतील पान टपरीवर छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

एपीएमसी पोलिसांनी भाजी बाजारातील एका पान टपरीवर छापा टाकून गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा हजारो रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

नवी मुंबई - एपीएमसी पोलिसांनी भाजी बाजारातील एका पान टपरीवर छापा टाकून गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा हजारो रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

एपीएमसी बाजारातील पान टपरीमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भाजी बाजारातील सुभाष श्रीवास्तव (21) याच्या श्री पान महल या पान टपरीवर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी टपरीची तपासणी केली असता गुटखा, च्युइंग तंबाखू, गुटखा पानसुपारी, पान मसाला गुटखा असा सुमारे 21 हजार 110 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. टपरीचालक सुभाष श्रीवास्तव याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. 

दरम्यान, गत महिन्यामध्ये अन्न-औषध प्रशासन आणि नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने संयुक्तपणे एपीएमसीच्या भाजी मार्केटमधील दोन पान टपरीवर छापा टाकला होता. त्या वेळी पथकाने दोन्ही पान टपरींमधून हजारो रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करून दोन्ही पान टपऱ्या सील केल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: APMC police raided a vegetable shops on the market