मुंबई पोलिसांची माफी माग, निवृत्त पोलिसाकडून कंगना राणावतला नोटिस

सुनीता महामुणकर
Tuesday, 8 September 2020

मुंबई पोलिस आणि राज्य सरकारवर तिखट शेरेबाजी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात निवृत्त पोलिस अधिकाऱ्यानं ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा कायदेशीर नोटिसद्वारे दिला आहे.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस आणि राज्य सरकारवर तिखट शेरेबाजी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात निवृत्त पोलिस अधिकाऱ्यानं ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा कायदेशीर नोटिसद्वारे दिला आहे. कंगनाने मुंबई पोलिसांची जाहीर माफी मागावी अशी मागणी या नोटिसमध्ये करण्यात आली आहे.

मुंबई पोलिस आणि पोलिस आयुक्तांबाबत केलेल्या वादग्रस्त ट्विट आता कंगनाच्या अडचणीत वाढ करणाऱ्या ठरु शकतात. निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप लोणंदकर यांनी कंगनाला अॅड मोहन जयकर यांच्या मार्फत नोटीस बजावली आहे. कंगनाने १ आणि २ सप्टेंबररोजी केलेल्या ट्विटमध्ये पोलिस आयुक्तांना टॅग करून टीका केली होती. त्यात तिनं एका ट्विटचा आधार घेऊन ते ट्विट आयुक्तांनी केले आहे, असे दाखविले होते. मात्र ते ट्विट माझे नाही आणि त्याची चौकशी सुरू केली आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. असे असतानाही कंगनाने अद्यापही ती वादग्रस्त ट्विट डिलीट न करता आणि त्यानंतर अनेकदा बदनामीकारक ट्विट करून मुंबई पोलिस आणि आयुक्तांना लक्ष्य केले, असा दावा नोटिसमध्ये करण्यात आला आहे.

अधिक वाचाः  धारावीत नवे ५ रुग्ण, दादरमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

याबद्दल तिनं जाहीर माफी मागावी, मुंबई पोलिसांच्या संबंधित सर्व ट्विट डिलीट करावी आणि मुंबई पोलिस विकास निधीला ५० लाख रूपयांची मदत करावी, अशा मागण्या लोणंदकर यांनी केल्या आहेत. मुंबई पोलिस कोरोना संसर्गाचा सामना करत नागरिकांसाठी झटत आहेत. पण अशा प्रकारे नाहक त्यांची प्रतिमा मलीन केली जात आहे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
-------

(संपादनः पूजा विचारे) 

Apologizes Mumbai Police Kangana Ranawat gets notice from retired police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apologizes Mumbai Police Kangana Ranawat gets notice from retired police