'...या' शहरांमध्ये राज्य सरकारकडून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकांची नेमणूक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

राज्यातील अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबई : राज्यातील अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

ही बातमी वाचली का? 'जनतेचं काहीही होऊ द्या, पण मी पुन्हा येईन'!- जयंत पाटील यांचे विरोधकांवर टीकास्त्र

मुंबईतील ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची सांगली येथे कोरोनाच्या नियंत्रणासाठी यापूर्वीच नेमणूक करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या प्रसार रोखण्यात चांगले यश आले आहे. आता डॉ. पल्लवी सापळे आणि औरंगाबाद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. भारत चव्हाण हे अहमदनगर येथे जाऊन, कोरोनाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपचार पद्धतीबरोबरच तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. 

ही बातमी वाचली का? 'मुळशी पॅटर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत... 

धुळे येथील भाऊसाहेब हिरे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रोफेसर डॉ. श्रीराम गोसाई आणि याच महाविद्यालयातील सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. अजय सुभेदार हे मालेगाव येथे जाऊन कोरोना नियंत्रणाचे काम पाहतील; तर सोलापूर येथील डॉ. वैशंपायन मेमोरियल सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि याच महाविद्यालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रसाद यांची सोलापूर येथील कोरोना नियंत्रणासाठी उपचार आणि तांत्रिक सल्ला देण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. ही तज्ज्ञ डॉक्‍टरांची पथके तातडीने कार्यभार स्वीकारणार असून, कोरोनाला आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of expert doctors squad by the State Government at Malegaon, Ahmednagar, Solapur