विधिमंडळ लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती

विनोद राऊत
Friday, 6 November 2020

विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली. माजी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री आशीष शेलार, जयकुमार रावल, विनय कोरे, संजय सावकारे यांचा समावेश आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; पहिली गुणवत्ता यादी 15 नोव्हेंबरला

लोकलेखा समिती ही राज्य विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती असून, विधिमंडळाच्या कामकाजात या समितीचे विशेष महत्त्व आहे. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षकांचा अहवाल, यांचे परिनिरीक्षण करणे, राज्य सरकारच्या वित्तीय लेख्यांचे व त्यावरील लेखा परीक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे.  

दिवाळीत फटाके फोडाल तर तुरुंगात जाल, मुंबईसह राज्यात निर्बंध येण्याची शक्यता

राज्याची महामंडळे, व्यापारविषयक व उत्पादनविषयक योजना व प्रकल्प यांचे उत्पन्न व खर्च दाखवणारी लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्ट महामंडळ, व्यापारी संस्था किंवा प्रकल्प यांना भांडवल पुरविण्यासंदर्भात नियमन करणाऱ्या वैधानिक नियमांच्या तरतुदीअन्वये तयार केलेला ताळेबंद व नफा-तोट्याच्या लेख्यांची विवरणे व त्यावरील नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणे. राज्यपालांनी कोणत्याही जमा रकमांची लेखा परीक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षकांना निर्देशित असेल, त्या अहवालाचे परीक्षण करणे ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्ये आहेत. 

----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Sudhir Mungantiwar as the Chairman of the Legislative Public Accounts Committee