अर्णब गोस्वामीला तत्काळ अटक करा! सचिन सावंत यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क 
Tuesday, 19 January 2021

अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली, असा प्रश्‍न करीत हा देशद्रोहाचा प्रकार असून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे 

मुंबई  : "रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी आणि "बार्क'चे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्‌सऍप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती अर्णब यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे त्यांच्या संभाषणातून स्पष्ट होत आहे. ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली, असा प्रश्‍न करीत हा देशद्रोहाचा प्रकार असून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

सावंत यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन गोस्वामींवर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी सावंत यांच्याबरोबर प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, गजानन देसाई, विनय खामकर हेही उपस्थित होते. 
सावंत म्हणाले, की संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे अत्यंत गंभीर आहे. लष्करी कारवाईसंदर्भातील माहिती बाहेर कशी आली? ती गोस्वामी यांना तीन दिवस आधी म्हणजे 23 फेब्रुवारी 2019 रोजी कशी काय मिळाली? त्यांनी ती अजून कोणाला दिली का? असे प्रश्‍न निर्माण होतात. मोदी सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीने ती माहिती आपल्याला दिली, असे गोस्वामी यांनीच सांगितले आहे. सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. गोस्वामी यांचे कृत्य कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. म्हणून सरकारने गोस्वामींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. 
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करू, असे आश्‍वासन दिल्याची माहिती सावंत यांनी दिली. 

मुंबई परिसरातील बातम्यांंचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय सुरक्षा धोक्‍यात 
अर्णब गोस्वामी आणि "रिपब्लिक टीव्ही'ने दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्सी बेकायदा वापरून प्रसारभारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. दूरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वन्सी वापरणे गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदा कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. जनतेचा पैसा लुबाडला असल्याने ईओडब्ल्यूकडून त्याची चौकशी करावी, अशी मागणी करीत सचिन सावंत यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्‍यात आली असल्याचा आरोप केला. 
Arnab Goswami arrested immediately Sachin Sawants demand to Home Minister Anil Deshmukh

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnab Goswami arrested immediately Sachin Sawants demand to Home Minister Anil Deshmukh