महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव 

भाईंदर (बातमीदार) ः बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने एका 26 वर्षीय पीडित महिलेला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी काशीमिरा पोलिसांनी आरोपीला अहमदाबाद (गुजरात) येथून अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी हा महिलेचा जवळचा नातेवाईक असल्याचे समजते.

सदर महिला आपली दोन मुले आणि बहिणीच्या मुलांसोबत राहते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता ही महिला मुलांचे नाश्‍त्याचे साहित्य व औषधे विकत घेऊन अदानी पॉवर सब-स्टेशनकडुन चालत घरी जात होती. रात्री 10.30 च्या सुमारास बलात्काराचा गुन्हा असलेला आरोपी मित्रासह दुचाकीवरून तिथे आला. या वेळी आरोपीने महिलेला बलात्काराचा गुन्हा मागे घे, तसेच स्टॅंम्प पेपरवर तसे लिहून देण्यासाठी दमदाटी केली.

मात्र महिलेने त्याला विरोध केल्याने हल्लेखोरांनी तिच्या अंगावर ज्वालाग्राही पदार्थांची बाटली फोडली. या वेळी महिलेने आरडाओरडा केल्याने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. बाटलीतील पेट्रोल व रॉकेलसारखे ज्वालाग्राही पदार्थ महिलेच्या अंगावर पडल्याने महिलेच्या डोळ्यांची जळजळ होऊ लागली. या वेळी जमलेल्या लोकांमधील एका तरुण-तरुणीने महिलेला काशीमिरा पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला उपचारासाठी भाईंदर येथील पं. भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी महिलेच्या अंगावर पेट्रोल किंवा रॉकेलसारखा ज्वालाग्राही पदार्थ ओतल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी आरोपीला अटक करण्यासाठी तातडीने तपास सुरू करून पथके रवाना केली. यातील महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला मुख्य आरोपी हा गुजरातच्या अहमदाबाद येथे असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सोमवारी अहमदाबाद येथून अटक केली. मंगळवारी आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अमित पाटील करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An attempt to burn a woman alive