मंत्र्यांना वाचवा बाईला नाचवा सरकारचा संतापजनक कार्यक्रम, अतुल भातखळकरांची टीका

मंत्र्यांना वाचवा बाईला नाचवा सरकारचा संतापजनक कार्यक्रम, अतुल भातखळकरांची टीका

मुंबई: जळगावच्या शासकीय वसतीगृहातील मुलींना पोलिसांनीच कपडे काढून नाचायला लावल्याचे उघड झाल्याने, मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा, हा महाविकास आघाडी सरकारचा अधिकृत कार्यक्रम आहे का, अशी शंका येऊ लागली आहे, अशी जळजळीत टीका भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

नुकत्याच उघड झालेल्या या प्रकाराबाबत गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. पण त्याखेरीज सारे काही शांत असून मुख्यमंत्र्यांच्या तर नाकावरील माशी देखील हलली नसल्याचे चित्र आहे. असहाय महिलांचा अशा प्रकारे गैरफायदा घेणाऱ्या या हैवानांना तत्काळ पोलिस कोठडीत घेणे गरजेचे आहे. मात्र मंत्र्यांना वाचवा अन बाईला नाचवा हेच या सरकारचे अधिकृत धोरण झाले असल्याने, त्यांच्याकडून फारशी अपेक्षाही करता येत नाही, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेत. त्याबाबत सरकारने लाजलज्जाही कोळून प्यायल्याचे दिसत आहे. तीन पक्षांमधील गावावरून ओवाळून टाकलेले गुंड एकत्र आल्यावर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहणार, असा प्रश्न विचारून भातखळकर पुढे म्हणतात की, एक मंत्री महिलेची फसवणुक करतो, दुसरा मंत्री आपल्या दुसऱ्या बायकोबाबत जनतेची फसवणुक करतो, असे प्रकार सुरु आहेत. सरकारच मंत्र्यांना वाचवते असे दिसल्याने गुंडांबरोबरच आता पोलिसही महिलांवर अत्याचार करू लागले आहेत. कोणालाही कोणाचाही धाक उरला नसल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे. तरच महिला राज्यात निर्धास्तपणे वावरू शकतील. 

हे सरकार आणखी किती खालच्या पातळीवर जाणार याची कल्पना फक्त त्यांनीच करावी. मात्र शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आम्ही तसे होऊ देणार नाही. राज्यातल्या आयाबहिणींच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व ते मार्ग वापरू. एरवी उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांच्या मोठमोठ्या महिला नेत्या महाराष्ट्रात निषेध नोंदवण्याची नाटके करतात. मात्र आपल्याच राज्यातील माताभगिनींविषयी त्यांना थोडातरी कळवळा असेल किंवा या घटनांबाबत थोडीतरी लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्याच सरकारला जळगावच्या घटनेबाबत कठोर कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Atul Bhatkhalkar criticized Mahavikas Aghadi government

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com