महाराष्ट्रद्वेष्टे कोण हे आधी उघड करा; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

कृष्ण जोशी
Sunday, 8 November 2020

मुख्यमंत्र्यांनी अशी शेखी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखेच आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रद्वेष्टे कोण हे त्यांनी सरळसरळ सांगून नावे घेतली असती तर बरे झाले असते.

मुंबई-  महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा कट उधळला, हे मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे, अशी जळजळीत टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज केली. जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांची उत्तरे न देता मुख्यमंत्री हा बागुलबुवा निर्माण करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

मुंबईतील फटाके व्यवसायाला सव्वाशे कोटींचा फटका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधताना वरील विधान केले होते. त्याद्वारे त्यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याचा समाचार घेताना भातखळकर यांनी त्यांना वरील टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी अशी शेखी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखेच आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रद्वेष्टे कोण हे त्यांनी सरळसरळ सांगून नावे घेतली असती तर बरे झाले असते; मात्र कायद्याचा गैरवापर करून लोकांना अटक करणे, त्यांना मारहाण करणे हे प्रकार होत आहेत ते न कळण्याइतकी जनता दूधखुळी नाही, असेही भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 

आरे अहवाल उघड करा! 
आरेमधील मेट्रो कारशेडसंदर्भातील निर्णय जनतेला योग्यवेळी सांगू, असे मुख्यमंत्री सांगतात; पण ती योग्य वेळ कधी येणार, असा प्रश्‍न विचारून भातखळकर पुढे म्हणतात की, तुमच्याच सरकारने नेमलेल्या सौनिक समितीने आरेमध्येच मेट्रो कारशेड करा, हे सांगितले आहे, त्यावर तुमचे उत्तर काय आहे? हा अहवाल तुम्ही जनतेसाठी केव्हा खुला का करत नाही? 

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Bhatkhalkar criticizes the Chief Minister