
Menstrual leave : एयू स्मॉल फायनान्स बँकेची महिलांना मासिकपाळी रजा
मुंबई : एयू स्मॉल फायनान्स बँकेने आज आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देणार असल्याचे जाहीर केले. बँकेतर्फे महिलांना अन्य रजांव्यतिरिक्त मासिक पाळी रजा धोरणांर्गत दर महिन्याला एक दिवसाची अतिरिक्त भरपगारी रजा दिली जाईल.
फेब्रुवारी महिन्यापासून या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. महिलांना काम करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्दीष्ठाशी हे धोरण सुसंगत असल्याचे बँकेतर्फे जाहीर करण्यात आले.
इंडस्ट्री फर्स्ट इनिशिएटिव्ह म्हणून बँकेने तीन वर्षांच्या सेवेनंतर कंपनी सोडलेल्या कर्मचार्यांसाठी खास 'एयू फॉरेव्हर पास' देखील सुरू केला आहे. त्यानुसार नोकरी सोडलेल्या विशिष्ठ पात्र कर्मचाऱ्यांना पुन्हा बँकेच्या सेवेत येण्याची संधी मिळेल.
महिला कर्मचाऱ्यांसह सर्वच कर्मचाऱ्यांच्या गरजा जाणून घेणारी कार्यस्थळ संस्कृतीच सर्वसमावेशक असते. त्यामुळे मासिकपाळी रजेसारखी धोरणे कंपनीची संवेदनशीलता दाखवून महिला कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करतील, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी संचालक संजय अग्रवाल म्हणाले.