नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! एक्‍सपायरी डेट विना मिठाई विक्री 

sweet-mar.jpg
sweet-mar.jpg

नवी मुंबई : उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ल्याने आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे उघड्यावर अन्न पदार्थ तसेच खुली मिठाई विक्रीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) काही मर्यादा आणल्या आहेत. दुकानात खुली विक्री होणाऱ्या मिठाई समोर मिठाई तयार केलेली तारीख आणि तिची कालबाह्य (एक्‍सपायरी डेट)चे फलक लावणे एफडीएने बंधनकारक केले आहे. या नियमांची 1ऑक्‍टोबरपासून अंमलबाजवणी करण्याचे निर्देश एफडीने मिठाई दुकानदारांना दिले होते. मात्र आता चार दिवस उलटूनही नवी मुंबईत खुली मिठाई विक्री होत असताना बहुतांश दूकानदारांनी या नियमाला हरताळ फासल्याचे चित्र आहे. मिठाईच्या शुद्धतेची खात्री नसतानाही सर्रासपणे मिठाई विक्री सुरू आहे. 
राज्यात सद्या कोरोना विषाणूंनी थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा उघड्यावरील अन्न खाल्यामुळे आजारात भर पडू नये, याकरीता अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने गुरूवार (ता.1) पासून राज्यातील सर्व मिठाईच्या दूकानदारांना उघड्या मिठाईवर "बेस्ट बिफोर' च्या तारखांचा स्पष्ट उल्लेख करण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेल्या अन्नाचा दर्जा चांगला राखून ग्राहकांना शाररीक बाधा होऊ नये, या मागचा प्राधिकरणाचा हेतू आहे. मात्र 1 ऑक्‍टोबर पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जरी प्राधिकरणाने दिले असले, तरी नवी मुंबई शहरातील मिठाई दूकानदारांनी प्रत्यक्षात या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. बेलापूर, नेरूळ, सिवूड्‌स, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या ठिकाणी असणाऱ्या नामांकीत कंपन्यांच्या व लहान मिठाई दूकानांमध्ये उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईवर कालबाह्यतेची तारीख दर्शवणारे फलक लावण्यात आलेली नाही. "सकाळ'च्या टीमने या भागातील बहुतांश दूकानांमध्ये स्वतः पाहणी करून चौकशी केल्यानंतरही दुकानदारांनी कालबाह्यतेची तारीख लावण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. काही दुकान मालकांनी या नियमाबाबत माहितीच नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. तर काही जणांनी तर वेळ मिळेल तसे आपण मिठाईसमोर कालबाह्यतेची तारीख लावू, असे थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली. 

 'सकाळ'ची प्रत्यक्ष पाहणी 
अन्न व सुरक्षा प्राधिकरणाने 1 ऑक्‍टोबरपासून उघड्यावरील अन्नावर कालबाह्यता आणि तयार केलेल्या दिनांक ठळक दिसेल असे फलक लावण्याचे अनिवार्य केले. तेव्हा पासून आदेशाची अंमलबजावणी झाली. टीम "सकाळ'ने सीबीडी बेलापूर येथील डेपोसमोरील बिकानेर येथील मिठाईच्या दूकानात तपासले असता उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या कोणत्याही मिठाईवर नियमाप्रमाणे बेस्ट बिफोरची तारीख लावलेली नव्हती. याबाबत विचारले असता दुकानातील कर्मचारी मुकेश चौधरी यांनी आपण लवकरच बिफोरचे फलक लावू, आमची प्रक्रीया सुरू असल्याचे सांगितले. नेरूळ रेल्वे स्थानकासमोरील बिकानेर येथे पाहणी केली असता तिकडेही तिच परिस्थिती आढळून आली. दूकानातील विक्रेते काजी पटेल यांनी मिठाईसमोर लवकच तारीख लावू असे सांगितले. नेरूळ येथील जामा मिठाई दूकानातही सुरूवातीला कालबाह्यता तारीख लावण्यात आली नव्हती. मात्र "सकाळ'ने चौकशी केल्यानंतर दुकानात कालबाह्यतेची तारीख लावण्यात आल्याचे मालक संजय आहूजा यांनी सांगितले. 

ग्राहकांनी काय करावे 
मिठाई तयार केलेल्या दिवसाची आणि कालबाह्यतेची तारीख लावलेली नसेल तर संबंधित ग्राहक दूकानदाराविरोधात पुराव्यानिशी अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर तक्रार करू शकतात. ग्राहकांनी अशा मिठाईचे फोटो काढून ते संकेतस्थळावर " कंज्युमर कन्सन' या पर्यायवर तक्रार करू शकता. देशातील आणि राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसणारा ग्राहक यावर तक्रार करू शकता. असे एफएसएसआयच्या माजी ग्राहक प्रतिनिधी वसुंधरा देवधर यांनी सांगितले. 

कोट... 
अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणीच्या तारखेपासून मिठाई तयार झालेली तारीख आणि कालबाह्यतेची तारीख लावणे अनिवार्य आहे. जे दुकानदार नियम पाळणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. 
शिवाजी देसाई, अतिरीक्त आयुक्त कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन 

avoid putting expiration date panels front sweets sweet sellers in navi mumbai

( संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com