esakal | आता कसं वाटतंय, शांत शांत वाटतंय ! वीस वर्षात पहिल्यांदाच मुंबईत शांततेत विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

आता कसं वाटतंय, शांत शांत वाटतंय ! वीस वर्षात पहिल्यांदाच मुंबईत शांततेत विसर्जन

यंदा आवाज फाउंडेशनने मुंबईतल्या अनेक गणेशमूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणाची नोंदणी केली आहे.

आता कसं वाटतंय, शांत शांत वाटतंय ! वीस वर्षात पहिल्यांदाच मुंबईत शांततेत विसर्जन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : ढोल नाही, डिजे नाही, मोठ-मोठे लाऊडस्पीकर नाही, गर्दी नाही आणि त्यासोबत ध्वनी प्रदूषण ही नाही. मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचं चित्र दिड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी मुंबईकरांनी अनुभवले आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सरकारने घातलेल्या नियमांचे पालन करतच यंदा घरगुती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दोन दशकांच्या परंपरेला फाटा देत पहिल्यांदाच एवढ्या शांततेत विसर्जन करण्यात आल्याची नोंद आवाज फाउंडेशन केली आहे.

सध्या मुंबईसह राज्यावर कोरोनाचे सावट आहे. यामुळे, गणेशोत्सव ही अगदी साध्या आणि नियमांचे पालन करुन साजरा करावा असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्या सर्व नियमांचे पालन करत यावर्षी गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या परंपरांना फाटा देत पहिल्यांदाच घरगुती आणि काही गणेश मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने दिड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. आवाज फाउंडेशनने नोंदवलेल्या अहवालानुसार, पहिल्यांदाच एवढ्या कमी आवाजात विसर्जन पार पडले आहे. याचा सकारात्मक परिणाम ध्वनी प्रदूषणावर झाला आहे.

मोठी बातमी - महाड दुर्घटना! इमारत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हे दाखल; जाणून घ्या इमारतीविषयी सविस्तर माहिती

यंदा कोरोनाचे संकट पाहून पर्यावरण आणि गणेशोत्सव या दोघांचीही मुंबईकरांनी यंदा काळजी घेतली आहे. दरम्यान, यापुढच्या गणेशोत्सवाच्या कालावधीतही गणपती मंडळांकडून असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आवाज फाउंडेशनच्या या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि संयोजक सुमेरा अब्दुल्लाली यांनी व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या संकटातून धडा घेऊन आगामी वर्षांमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवासाठीही गणपती मंडळे अशीच शिस्त कायम ठेवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा आवाज फाउंडेशनने मुंबईतल्या अनेक गणेशमूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणाची नोंदणी केली आहे. मात्र, यंदा गणपती विसर्जन शांततेत पार पडले असल्याचा अहवाल आवाज फाउंडेशनने जाहीर केला आहे. अनेक गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी नव्हती. तसेच कुठेही लाऊडस्पीकर किंवा मोठा आवाज करणाऱ्या वाद्यांचा उपयोग झाला नाही.

वरळीत सर्वाधिक आवाजाची नोंद -

सर्वाधिक आवाजाची नोंद ही वरळी डेअरी येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत झाली. त्याठिकाणी मोठ्या वाद्यांचा वापर करण्यात आल्याने त्याठिकाणचे ध्वनी प्रदुषण हे 100.7 डेसिबल इतके नोंदवण्यात आले. वरळीतच एका ठिकाणी फटाके फोडण्यात आल्याची नोंद आहे.  माहीम मच्छीमार कॉलनी तसेच खारदांडा याठिकाणी थोडी गर्दी झाली होती असेही अहवालातून सांगण्यात आले आहे. जवळपास दोन दशकातला हा सर्वाधिक शांततामय असा गणेशमूर्ती विसर्जन सोहळा होता असेही अब्दुल्लाली यांनी स्पष्ट केले आहे.

मोठी बातमी - काँग्रेस नेते सचिन सावंत भडकलेत म्हणालेत, "गद्दार महाराष्ट्र भाजपा अजूनही करतायत..."

आवाज फाउंडेशनचा अहवाल  (डेसिबलमध्ये)

 • माऊंट मेरी 65.3
 • खार दांडा 68.3
 • खार जिम 67.6
 • जुहू कोळीवाडा 68.1
 • जुहू बीच 64
 • जुहू तारा रोड 77.2
 • शिवाजी पार्क 53.1
 • वरळी नाका 67.6
 • गिरगाव चौपाटी 67.5
 • वरळी डेअरी 100.7 (सर्वाधिक)
 • वरळी नाका 91

( संकलन - सुमित बागुल ) 

awaaz foundation shared data about sound pollution during ganesh festival

loading image
go to top