डॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीव हवी; मारहाण करणाऱ्यास एक लाखाचा दंड

सुनिता महामुणकर
Tuesday, 27 October 2020

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे दु:ख समजले जाऊ शकते. मात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीवही ठेवायला हवी, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे दु:ख समजले जाऊ शकते. मात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीवही ठेवायला हवी, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. डॉक्‍टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला एक लाख रुपयांचा दंड सुनावत, न्यायालयाने ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहे.

कंगनाच्या अडचणी वाढणार? कंगनावर कारवाईसाठी वकिलांचे महाधिवक्त्यांना पत्र

बारामती पोलीस ठाण्यात शिवाजी जाधव (28) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या एका निकटवर्तीयाचा मृत्यू बारामती येथील रुग्णालयात झाला होता. मात्र मृत्यूचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी नाराज होऊन डॉक्‍टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या भीतीने जाधव यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर नुकतीच न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील एस. व्ही. गावंड यांनी या अर्जाला विरोध केला. आरोपीने रुग्णालयात गदारोळ निर्माण केला, डॉक्‍टरांना धमकी दिली, रुग्णसेविकांना अपशब्द वापरले. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करु नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे सिडको भवनासमोर आंदोलन; पोलिसांनी महिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप

अन्यथा जामीन रद्द 
दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जाधव यांना पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सशर्त जामीन मंजूर केला. मात्र जी कृती त्यांनी केली त्याची दखलही घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या वागणुकीसाठी त्याने एक लाख रुपयांचा दंड मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच दंडाची रक्कम भरली नाही तर जामीन रद्द होईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

---------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness of selfless service of doctors Court fines one lakh for beating