ऍक्सिस बँक प्रकरण, कॉक्स अँड किंग्सचे प्रमोटर पीटर केरकरसह तिघांना अटक

मिलिंद तांबे
Tuesday, 2 March 2021

ऍक्सिस बँकेची 1030 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. 

मुंबई : कॉक्स अँड किंग्सचे प्रमोटर अजय अजीत पीटर केरकर, CFO अनिल खंडेलवाल आणि ऑडिटर नरेश जैन यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ऍक्सिस बँकेची 1030 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. 

बँका आणि पतसंस्थांचे पैसे बुडवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेत त्यांच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. ईडीने यापूर्वी त्यांना अटक केली होती. त्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेतला. ऍक्सिस बँकेच्यावतीने उपाध्यक्ष प्रकाश प्रभाकर राव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाची बातमी कोर्टाने दिला नकार, "मुलाचा ताबा जन्मदात्या आई वडिलांना दिला जाऊ शकत नाही"; नक्की झालं काय होतं?

नऊ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार बँकेकडून कर्जासाठी घेण्यात आलेली रक्कम इतर खात्यांवर वळवण्यात आल्याचा आरोप आहे. एकूण 1030 कोटी रुपये बुडवल्याचा बँकेचा आरोप आहे. केरकरचा ताबा आर्थर रोड कारागृहातून तर खंडेलवाल आणि जैन यांचा ताबा तळोजा कारागृहातून घेण्यात आला आहे.

याप्रकरणाशिवाय लक्ष्मी विलास बँकेचे 35 कोटी रुपये बुडवल्या प्रकरणी त्याच्याविरोधात डिसेंबर महिन्यात शेवटचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग फसवणूक-2 कक्ष याप्रकरणी तपास करत आहे. यापूर्वी एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि खासगी गुंतवणूकदार कंपनी यांनी तक्रार केली आहे.

मोठी बातमी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा 'स्पाईक', कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक

त्या पाच तक्रारीनुसार 1950 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. कॉक्स अँड किंग्सचे पीटर केरकर यांच्याही तक्रारीवरून याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचीही तपासणी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी कंपनीचे सीएफओ अनिल खंडेलवाल यांचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेने घेतला आहे.

axis bank case cox and kings promoter peter kerkar and three more arrested

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: axis bank case cox and kings promoter peter kerkar and three more arrested